केडीएमसी : ‘महासभेत नगरसेवक पिस्तूल लावून कोणत्या नियमाने बसतात?’

केडीएमसी : ‘महासभेत नगरसेवक पिस्तूल लावून कोणत्या नियमाने बसतात?’

शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे

केडीएमसीतील भ्रष्टाचारावर आवाज उठविल्याने जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी महासभा आणि स्थायी समितीच्या सभांना गैरहजर राहण्याची परवानगी मागितली हेाती. मात्र पालिका सचिवांनी म्हात्रे यांना पत्र पाठवून महापालिका अधिनियमातील कलम २२ आणि कलम ११ पोटकलम (क) या मधील तरतुदीकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे म्हात्रे यांनी महासभेत नगरसेवक पिस्तूल लावून कोणत्या कलमाखाली आणि नियमान्वये बसतात? त्यांच्यावर कोणत्या कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल? असा सवाल पालिका सचिव संजय जाधव यांना एका पत्राद्वारे केला आहे. त्यामुळे सभागृह असुरक्षित असल्याचे समोर येत असून म्हात्रे यांनी यावर बोट ठेवले आहे, यावर पालिका सचिव काय उत्तर देतात याकडं लक्ष वेधलं आहे.

बिल्डर ठेकेदार आणि अधिकारी यांच्यापासून धोक्याचा दावा

पालिकेतील ओपन लॅण्ड टॅक्स आणि ई निविदा प्रकरणात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नगरसेवक म्हात्रे यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग आणि मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे. भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविल्याने बिल्डर, ठेकेदार आणि अधिकारी यांच्यापासून जिवीताला धोका आहे. त्यामुळे महासभेत आणि स्थायी समितीत येऊ शकणार नसल्याने गैरहजर राहण्यास परवानगी मिळावी, असे पत्र म्हात्रे यांनी २९ मे रोजी पालिका आयुक्त आणि सचिवांना दिले होते. म्हात्रे यांना सचिवांनी एका ओळीत उत्तर देऊन, महापालिका अधिनियमातील तरतुदीकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे म्हात्रे यांनी जिवीताचे बरे वाईट झाल्यास सचिव जबाबदार असल्याचा थेट आरोप केला आहे.

…तर सभागृहात गोळी लागू शकते

‘महापालिका मुख्यालयाच्या परिसरात दर महासभेला आणि स्थायी समिती सभेला अनेक बिल्डर ठेकेदार अधिकारी आणि गुंड स्वरूपाच्या व्यक्ती यांची वर्दळ आणि गर्दी असते. तसेच काही लोकप्रतिनिधी पिस्तूल आणि रिव्हॉल्वर घेऊन सभागृहात हजर असतात. त्यांच्यावर कोणत्या कायद्याखाली आणि नियमान्वये कारवाई करण्यात येईल? त्याबाबत नियमातील तरतुदी आणि कलम सांगावे. कदाचित एखाद्यावेळी सभागृहातही कोणी गोळी घालेल, याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच प्रेक्षक गॅलरीत २५ ते ३० गावगुंड प्रवृत्तीचे लोक सभेचे कामकाज पाहण्याच्या निमित्ताने बसलेले असतात. तेथूनही कोणती गोळी सरळ लोकप्रतिनिधीला घालू शकतो. त्यामुळे अशी कृती घडू नये म्हणून नियमांचे आणि कलम कोणती आहेत? याची माहिती द्यावी’, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.

First Published on: June 7, 2019 9:29 PM
Exit mobile version