केडीएमसीचे शिलकी अंदाजपत्रक अखेर मंजूर

केडीएमसीचे शिलकी अंदाजपत्रक अखेर मंजूर

केडीएमसी मुख्यालय

कल्याण डोंबिवली महापालिकेचे सन 2019- 20 चे 2123 कोटी 99 लाख जमा व 2123 कोटी 88 लाख खर्चासह, 10 लाख 51 हजार शिलकी अंदाजपत्रक स्थायी समितीचे सभापती दिपेश म्हात्रे यांनी गुरुवारी महापौर तथा पीठासीन अधिकारी विनिता राणे यांना सर्वसाधारण सभेत सादर केले. आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू होऊ शकते. त्यामुळे सर्वपक्षीय सदस्यांनी दिलेल्या उपसुचनेसह हे अंदाजपत्रक मंजूरही करण्यात आले. महापालिका क्षेत्रात सुमारे 80 हजार मालमत्तांना कर आकारणी करण्यात आलेली नाही. तसेच पाणीपट्टीची 30 ते 40 कोटी थकबाकी आहे. त्यामुळे मालमत्ता कर आणि पाणी पट्टी थकबाकीदारांची माहिती दररोज फेसबूक, वॉटसअप या सोशल मिडीयावर दररोज प्रसिद्ध करावीत. त्यामुळे उत्पन्न वाढीस मदत होईल, अशी नवीन संकल्पना स्थायी समितीचे सभापती दिपेश म्हात्रे यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली.

महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने 186 कोटी रुपयांची वाढ करून सभापती म्हात्रे यांनी गुरुवारी अंदाजपत्रक महासभेत सादर केले. आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू होण्याची शक्यता असल्याने अंदाजपत्रक त्वरीत मंजूर करावे अशी मागणी सत्ताधारी शिवसेना भाजपच्या सदस्यांकडून करण्यात आली. मात्र सत्ताधार्‍यांच्या मागणीला मनसेने तीव्र विरोध दर्शविला, चर्चेनंतरच अंदाजपत्रक मंजूर करण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर व मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी केली. त्यावेळी सत्ताधारी व विरोधकांमध्ये गोंधळ झाल्याने महापौरांनी दहा मिनीटे सभा तहकूब केली. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर सदस्यांच्या उपसुचनेसह अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. डोंबिवली पश्चिमेतील सिद्धिविनायक टॉवर येथे फुलपाखरू उद्यान तयार करण्यासाठी दीड कोटीची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. मैदान विकसित करण्यासाठी 9 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विविध ठिकाणी ई टॉयलेट साठी (5 कोटी ), रुग्णालये व दवाखाने (10. 11 कोटी), रुग्णालय स्वच्छतेसाठी (1 कोटी), नवजात बालकासाठी इनक्युबेटर व्यवस्था (1 कोटी) डोंबिवली शास्त्रीनगर रूग्णालय नवजात बालकांसाठी एनआयसीयू तयार करणे उपकरणे खरेदीसाठी (2 कोटी) तरतूद करण्यात आली आहे.

उत्पन्नाच्या बाबी

मालमत्ता कर : 434. 94 कोटी
स्थानिक संस्था कर : 281. 75 कोटी
विशेष अधिनियमाखाली वसुली : 209. 10 कोटी
बीएसयुपी व वाणिज्य वापर अधिमूल्य : 337 कोटी
पाणीपट्टी : 80.20 कोटी
महापालिका मालमत्ता उपयोगिता व सेवा: 109 .05 कोटी

नगरसेवकांना गटार बांधण्यासाठीही निधी                                                                              आर्थिक वर्ष अडचणीचे असल्याचे पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी स्पष्ट करीत दरवर्षी गटार पायवाटा व छोट्या स्वरूपाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली जात असल्याने अशा कामांना प्रशासनाने तयार केलेल्या अंदाजपत्रकातील या कामांना कात्री लावली होती. मात्र स्थायी समितीने सुचविलेल्या कामांमध्ये गटार बांधणे दुरुस्ती व झाकणे बसविणे या कामांसाठी प्रति नगरसेवक 5 लाख अशी सुमारे 6 कोटी 35 लाखांची तरतूद केली आहे. तसेच नगरसेवक स्वेच्छानिधी अंतर्गत महसुली उत्पन्नातून बांधील खर्च वजा जाता शिल्लक उत्पन्नाचे जास्तीत जास्त 2 टक्के निधी राखून ठैवण्याची तरतूद आहे. पालिका आयुक्तांनी आगामी अर्थसंकल्पीय वर्षासाठी अंदाजपत्रकात प्रती नगरसेवक 5 लाख तरतूद प्रस्तावित केली होती. मात्र स्थायी समितीने नगरसेवक निधीत वाढ करून प्रति नगरसेवक 15 लाख रुपये करण्यात आली. तसेच स्थायी समिती सदस्य व नगरसेवकांसाठी प्रति नगरसेवक 10 लाख गटारे बांधणे दुरूस्ती व झाकणे बसविणे प्रत्येक नगरसेवक 5 लाख तर स्थायी समितीने सुचवलेली विविध विकास कामे प्रति नगरसेवक 20 लाख अशी प्रत्येक नगरसेवकांसाठी 40 लाख व पदाधिकारी यांच्यासाठी 50 लाख अशी तरतूद करण्यात आली.

नवीन रस्ते उड्डाण पुलासाठी 200 कोटींची तरतूद
महापालिका क्षेत्रात वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. वाढत्या वाहतूक कोंडीमुळे पालिकेला रोषाला सामोरे जावे लागल्याने रस्त्यांची देखभाल दुरुस्तीसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला. कल्याण पत्रीपूलाच्या वाहतूक कोंडीमुळे नवीन पूल बांधला जात आहे. वाढत्या नागरिकरणाच्या दृष्टीने नवीन रस्ते उड्डाणपूल भूयारी मार्ग कामे प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहेत. कल्याण पूर्वेत 100 फूट डीपी रस्ता तयार करणे, पुनालिंक रोडला 100 फूटी समांतर रस्ता तयार करणे, डोंबिवली ते शीळफाटा या रस्त्यावरील वाहतूक समस्येमुळे प्रिमीअर ते संदप गाव ते ठाण महापालिका हद्द 30 मीटर डीपी रस्ता प्रस्तावीत आहे. रस्ते व पूल देखभाल दुरुस्ती निगा व खड्डे भरणे ( 45. 65 कोटी), डीपी अंतर्गत नवीन रस्ते रूंदीकरण काँक्रीटीकरण ( 102. 36 कोटी), ठाकुर्ली मोहने वालधुनी उड्डाणपूलासाठी पूल व भुयारी मार्ग (34 कोटी), ठाकुर्ली फाटक ते रेल्वे समांतर उन्नत मार्ग ( 5 कोटी), महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजनेतंर्गत काँक्रीटीकरण (23.19 कोटी) अशी तरतूद करण्यात आली आहे.

First Published on: March 1, 2019 5:17 AM
Exit mobile version