केडीएमसीची महासभा पोलिसांची नवी डोकेदुखी

केडीएमसीची महासभा  पोलिसांची नवी डोकेदुखी

kdmc

प्रतिनिधी:-शहरातील वाढत्या गुन्ह्यांवरील घटनांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच पोलिसांना आता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेला बंदोबस्त ठेवण्याची वेळ आली आहे, महापालिकेच्या महासभेत नगरसेवक आणि त्यांच्या बॉडीगार्डमध्ये होणा-या घटनांमुळे आता पोलिसांना विशेष बंदोबस्त ठेवावा लागत असल्याने पोलिसांची ही नवी डोकेदुखी बनली आहे. गेल्या दोन महिन्यात घडलेल्या घटनांमुळे काल महासभेच्या दिवशी पालिकेच्या आवारात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महासभेत जनतेचा आवाज उठविण्यासाठी लोकप्रतिनिधींना निवडून दिले जाते. मात्र तेच लोकप्रतिनिधी आपआपसात भांडत असल्याने, त्यांच्यासाठी पोलीस बंदेाबस्त ठेवावा लागत असल्याने लोकप्रतिनिधींची प्रतिमा जनमानसात मलीन होत आहे.

काही दिवसांपूर्वीच स्थायी समितीच्या भरसभेत गॅमन इंडियाच्या प्रकरणावरून स्थायी समिती सभापती राहुल दामले आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यात वाद झाला होता. म्हात्रे हे दामले यांच्या अंगावर धावून गेले होते. अखेर दामले यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दामले यांनी हे प्रकरण थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातले होते. तसेच सप्टेंबर महिन्याच्या सभेत डोंबिवली पश्चिमेतील बहुचर्चित मोठागाव ठाकुर्ली येथे बांधण्यात येणार्‍या उड्डाणपुलाच्या मुद्यावरून शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि सेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. यावेळी प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोन्ही नगरसेवकांच्या बॉडीगार्ड समर्थकांनी थेट सभागृहाकडे घुसण्याचा प्रयत्न केला होता. समर्थकांकडे शिवीगाळ व हाणामारीचा प्रकार घडला होता. त्यामुळे खूपच गोंधळ झाला होता. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात नगरसेवक दीपेश म्हात्रे आणि रमेश म्हात्रे यांच्यासह ३४ जणांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेची स्थायी समितीची सभा असो वा सर्वसाधारण सभा यामध्ये नगरसेवक आणि त्यांचे बॉडीगार्ड आपआपसात भिडत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हेात आहे तसेच नगरसेवक व त्यांचे बॉडीगार्ड हे पालिकेच्या सुरक्षा रक्षकांना व अधिका-यांना जुमानत नाहीत. त्यामुळे पालिकेने पेालिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. त्यानुसार आजच्या महासभेच्या दिवशी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच पेालिसांच्या मोठ्या गाड्याही मागवण्यात आल्या होत्या.

अग्निसुरक्षा कक्ष रिकामेच

गळ्यात सोन्याची जाडी चैन, हातात ब्रेसलेट आणि अवती भोवती १५ ते २० बॉडीगार्डचा लवाजमा घेऊन अनेक नगरसेवक महासभेत येतात. अशा दादा-भाई नगरसेवकांची कल्याण डोंबिवलीत संख्या कमी नाही. अनेक नगरसेवकांकडे पिस्तुल बाळण्याचा परवाना आहे. महासभेत सभागृहात जाण्यापूर्वी प्रत्येक नगरसेवकाने आपले परवानाधारक पिस्तुल पालिकेच्या नियमानुसार सुरक्षा रक्षकांच्या केबीनमध्ये जमा करावे लागते. पण अग्निसुरक्षा कक्षात एकाही नगरसेवकाने आपले पिस्तुल जमा केले नव्हते, अशी माहिती पालिकेच्या सुरक्षा रक्षकांकडून मिळाली. प्रत्येक महासभेच्या दिवशी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल, असे पालिकेचे उपायुक्त सुरेश पवार यांनी सांगितले होते. त्यानुसारच आजच्या महासभेच्या दिवशी पालिकेच्या गेटवरच पोलीस आणि सुरक्षा रक्षकांचा गराडा पाहावयास मिळाला.

First Published on: November 19, 2018 5:27 AM
Exit mobile version