आयुष्यमान भारत योजना आली उपयोगी

आयुष्यमान भारत योजना आली उपयोगी

पालिका हॉस्पिटलमधील उपकरणांना बारकोडींग

समाजातील गोरगरीब आणि वंचित कुटुंबियांसाठी देण्यात आलेली केंद्र सरकारची आयुष्यमान योजनेतून केईएम हॉस्पिटलमध्ये पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. १७ वर्षाच्या मुलावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली असून या शस्त्रक्रियेची माहिती पंतप्रधान कार्यालयालाही देण्यात आली आहे. या मुलावर हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसंच, दुसरी हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली आहे.

उपचारासाठी नाशिकहून मुंबईला

सिद्धांत हजारे असे या रुग्णाचे नाव असून तो मुळ नाशिक येथील रहिवासी आहे. सिद्धांत सिकलसेल आणि अॅनिमियाने त्रस्त आहे. त्याला मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तपासण्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. बुधवारी ९ जानेवारीला ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑर्थोपेडिक शल्यचिकित्सक डॉ. एम. एम. देसाई आणि त्यांच्या टीमने ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. यावेळी आयुषमान भारत योजनेचा लाभ देण्यात आला.

काय म्हणाले केईएमचे अधिष्ठाता

यावर बोलताना केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितलं की, सिद्धांतच्या एका हिप रिप्लेसमेंटची आजच शस्त्रक्रिया करण्यात आली. अद्याप दुसऱ्या हिपची शस्त्रक्रिया करणे बाकी आहे. त्याला सिकलसेल आणि अॅनिमियाचा त्रास होता. आयुषमान भारत योजनेंतर्गत त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबईतील ही पहिली शस्त्रक्रिया आहे. तर, राज्यातील ही दुसरी शस्त्रक्रिया आहे.

First Published on: January 10, 2019 10:19 PM
Exit mobile version