करोना संसर्गच्या काळात केईएम रुग्णालय कर्मचार्‍यांचे काम बंद

करोना संसर्गच्या काळात केईएम रुग्णालय कर्मचार्‍यांचे काम बंद

केईएम हॉस्पिटलमधील सर्व संवर्गातील कर्मचार्‍यांनी करोनाशी निगडित उद्भवलेले प्रश्न आणि प्रशासन कर्मचार्‍यांच्या सुरक्षेकडे करत असलेला कानाडोळा, यामुळे मंगळवारी तब्बल पाच तास उत्स्फूर्तपणे जोरदार आंदोलन केले. कर्मचारी कामावर नसल्याने त्याचा परिणाम रुग्णसेवेवर झाल्याने बराच वेळ रुग्ण सेवा कोलमडली होती.

केईएममध्ये २४ मे रोजी मृत झालेले सुरेंद्र सतबिरसिंग सरकनिया हे करोना हाय रिस्क वॉर्डमध्ये कार्यरत असल्याने त्यांच्या कुटुंबियांना संशयित करोना म्हणून डीसी देण्याबरोबरच पालिकेकडून विशेष अनुदान ५० लाख आणि पी. टी. केसद्वारे नोकरी देण्यात यावी, करोना रुग्णांची सेवा करणार्‍या कर्मचार्‍यांना करोना प्रादुर्भाव झाल्यास त्यांना स्वतंत्र कक्षामध्ये दाखल करावे, करोनामध्ये काम करणारे कर्मचारी आणि मुंबई बाहेरून आलेल्या कर्मचार्‍यांना रहाण्याची सोय करणे, करोनामध्ये रोजंदारी आणि बहुउद्देशीय कामगारांना रिक्त पदांवर सामावून घेणे, कामगारांची बदनामी करणार्‍या विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा जाहीर निषेध करण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी केईएममधील कर्मचार्‍यांनी आंदोलन केले. तब्बल पाच तासांच्या आंदोलनानंतर अखेर प्रशासनाने मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. दुपारनंतर आंदोलन मागे घेण्यात आले, असे म्युनिसिपल मजदूर यूनियनचे चिटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी कर्मचार्‍याच्या मुद्द्यावर झालेल्या चर्चेत के.ई.एम.हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख, डॉ. निर्मला बारसेंसह प्रमुख कर्मचारी अधिकारी मिलिंद शहाणे, प्रशासकीय अधिकारी आणि सर्व संवर्गातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

First Published on: May 27, 2020 5:44 AM
Exit mobile version