शबरीमला देवस्थान निर्णयाविरोधात केरळी समाजाची निदर्शने

शबरीमला देवस्थान निर्णयाविरोधात केरळी समाजाची निदर्शने

शबरीमला मंदिर

शबरीमला देवस्थानात महिलांच्या प्रवेशाबाबत नुकताच सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. या निर्णयाविरोधात ‘शबरीमला आचार संरक्षण समिती’द्वारे आज वाशी रेल्वे स्थानकात दुपारी मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली. ‘धर्म वाचवा, शबरीमला वाचवा’ असे फलक हातात घेतलेले सुमारे १० हजार केरळी भाविक यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे यात ६० टक्के महिलांचा समावेश होता. यावेळी वाशी स्टेशनपासून केरळ हाऊसपर्यंत मोर्चा काढण्यात आला. कांजूरमार्ग येथील अय्यप्पा मंदिराचे प्रमुख स्वामी कृष्णानंद सरस्वती यांनी मोर्चाच्या समारोप प्रसंगी यावेळी आपले विचार मांडले. तर १३ ऑक्टोबर रोजी दुपारी आझाद मैदान येथेही व्यापक स्वरुपात निदर्शने करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महिलांना शबरीमला देवस्थानात प्रवेशबंदी

शबरीमला देवस्थानात १० ते ४५ वर्षे वयोगटाच्या महिलांना प्रवेशबंदीच्या प्रथेवर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता. या निर्णयामुळे सर्व वयोगटातील महिलांना शबरीमला मंदिर प्रवेशाचा मार्ग खुला झाला होता. परंतु हा निर्णय आपल्या धर्मपरंपरांच्या विरोधात असल्याची केरळी समाजाची भावना आहे. या भावनेतूनच मोठ्या प्रमाणात केरळी समाज अशा आंदोलनांमध्ये सहभागी होत असल्याचे असे शबरीमला आचार संरक्षण समितीचे सदस्य पी. सुरेश बाबू यांनी सांगितले. भारतात तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया देशांसह जगभरात शबरीमला देवस्थान वाचवण्यासाठी अशी निदर्शने करण्यात आली आहेत. आझाद मैदान येथील आंदोलनात २५ हजार संख्येने केरळी जनतेचा सहभाग अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वास्तविक, शबरीमला देवस्थान हे मुख्य रस्त्यापासून आठ किलोमीटर आत उंचावर असून अवघड पायवाटेने चालत तिथे पोहचावे लागते. शबरीमला येथे उत्सवकाळात कोट्यवधी भाविक दर्शनाला येतात. त्यात बहुसंख्येने पुरुष असतात. शबरीमलाची महिलांच्या प्रवेशासंबंधीची प्रथा अनेक शतकांपासून सुरू आहे. अशा परंपरांना विरोध करणे म्हणजे आपल्या परंपरा सोडण्यासारखे आहे. केरळमध्ये विशेषतः महिलांचाच या निर्णयाला विरोध आहे.  – पी. सुरेश बाबू, शबरीमला आचार संरक्षण समितीचे सदस्य

First Published on: October 12, 2018 9:15 PM
Exit mobile version