घाटकोपर येथील सोन्याच्या व्यापार्‍याचे अपहरण करुन हत्या

घाटकोपर येथील सोन्याच्या व्यापार्‍याचे अपहरण करुन हत्या

प्रातिनिधिक फोटो

घाटकोपर येथील एका सोन्याचे व्यापार्‍याचे अपहरण करुन हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. राजेश्वर किशोरीलाल उदानी असे या व्यापार्‍याचे नाव असून त्यांच्या हत्येमागील कारण समजू शकले नाही. मात्र त्याचा मृतदेह पनवेल येथे कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी अपहरणासह हत्या आणि हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला असून पळून गेलेल्या मारेकर्‍यांचा शोध सुरु केला आहे. याच गुन्ह्यात रात्री उशिरा एका संशयिताला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीचा तपशील समजू शकला नाही.

राजेश्वर उदानी हे व्यवसायाने व्यापारी असून त्यांची सराफ पेढी आहे. सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत घाटकोपर येथील कामा लेनवरील महालक्ष्मी अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक 501 मध्ये राहतात. 29 नोव्हेंबरला राजेश्वर हे घरातून काही कामानिमित्त निघून गेले, रात्री उशिरापर्यंत ते घरी आले नाहीत, त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला, मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडे चौकशी केली असता ते त्यांच्याकडे गेले नसल्याचे समजले. अखेर दुसर्‍या दिवशी त्यांचा मुलगा रौनक उदानी याने पंतनगर पोलिसांत त्यांच्या मिसिंगची तक्रार केली होती.

चप्पल, कपड्यांवरून मृतदेह ओळखला
या तक्रारीनंतर राजेश्वर यांचा पंतनगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच शुक्रवारी सकाळी पनवेल येथे एका व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळली होती. या माहितीनंतर पनवेल पोलिसांसह पंतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मृतदेहावरील कपडे आणि चप्पल पाहिल्यानंतर रौनक उदानी याने तो मृतदेह त्याच्या वडिलांचाच असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

अनैतिक संबंधातून हत्या?
या हत्येमागील कारण समजू शकले नाही, मात्र आर्थिक किंवा अनैतिक संबंधातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात राजेश्वर यांना डान्स बारमध्ये जाण्याचा शौक होता. तिथेच त्यांची काही बारबालांशी ओळख झाली होती. काही बारबालांच्या ते नियमित संपर्कात होते. त्यातून मारेकर्‍यांनी त्यांची हत्या केली का याचा आता पोलीस तपास करीत आहे. सायंकाळी एका संशयिताला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

First Published on: December 8, 2018 4:47 AM
Exit mobile version