सायन हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण होणार सुलभ

सायन हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण होणार सुलभ

मुंबई : मुंबई महापालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये दोन ‘मॉड्युलर ऑपरेशन थिएटर’ सुरू करण्यात आले आहेत. या थिएटरमुळे मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुलभ व सोपी होणार आहे, अशी माहिती पालिकेच्या प्रमुख हॉस्पिटलचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.

‘मॉड्युलर ऑपरेशन थिएटर’ उभारले

पूर्व उपनगरात लोकमान्य टिळक हॉस्पिटल हे पालिकेचे एकमेव मोठे हॉस्पिटल आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी असते. मुंबई बाहेरील रुग्ण व महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी या हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते. रुग्णांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक विभागाच्या ऑपरेशन थिएटरवर प्रचंड ताण असतो. त्यामुळे विविध विभागांपैकी मूत्रशल्यचिकित्सा विभागातील दोन ऑपरेशन थिएटरचे ‘मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर’मध्ये रुपांतर केले आहे. ऑपरेशन थिएटरमुळे सायन हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपणसारखी आव्हानात्मक शस्त्रक्रिया करणे सोपे होणार आहे. ‘मॉड्युलर ऑपरेशन थिएटर’मुळे शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला जंतुसंसर्गाची शक्यता तुलनेने कमी असते, अशी माहितीही महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयाचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी दिली आहे.

दिवसाला १० मूत्रपिंडे प्रत्यारोपण करता येणार

मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करताना मूत्रपिंड देणार्‍या व घेणार्‍या अशा दोन्ही व्यक्तींवर एकाचवेळी शस्त्रक्रिया करणे या थिएटरमुळे शक्य होणार असून, यात दिवसाला साधारणपणे १० शस्त्रक्रिया करता येतील. ऑपरेशन थिएटरची भिंत व छत स्टीलपासून बनवली असून, त्यावर जंतुप्रतिबंधक रंग लावला आहे. यामुळे हे ऑपरेशन थिएटर जीवाणु, बुरशी आणि धूळ प्रतिबंधक आहेत. दोन्ही शस्त्रक्रिया कक्षांमध्ये असणार्‍या ‘ऑपरेशन टेबल’वर कॅमेरे बसवले असल्याने प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना मार्गदर्शन मिळणार आहे.

 

First Published on: September 20, 2018 3:57 AM
Exit mobile version