Kirit Somaiya: मी वांद्रे पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दिलेली नाही – किरीट सोमय्या

Kirit Somaiya: मी वांद्रे पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दिलेली नाही – किरीट सोमय्या

नवनीत राणा आणि रवी राणा यांना खार पोलीस ठाणे येथे भेटायला गेलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी हल्ला झाला. बॉटल्स, चप्पल आणि दगडफेक करत ६० ते ७० जणांच्या शिवसैनिकांच्या जमावाने हल्ला केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. पण या प्रकरणातील एक महत्वाची माहिती किरीट सोमय्या यांनी ट्विट केली आहे. किरीट सोमय्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात कोणतीही एफआयआर दाखल केली नसल्याचा खुलासा त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून केला आहे. याआधी २३ एप्रिलला हल्ला झाल्यानंतर वांद्रे पोलिसांनी माझी तक्रार दाखल करून घेण्यासाठी नकार दिला होता, असाही खुलासा त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. तसेच खार पोलीस ठाण्यात मी उद्या मंगळवारी दुपारी १२ वाजता तक्रार दाखल करायला जाणार असल्याचेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मुंबई पोलिसांनी कट रचत केलेल्या बोगस एफआयआर विरोधात मी मंगळवारी दुपारी १२ वाजता तक्रार दाखल करणार असल्याचे किरीट सोमय्यांनी म्हटले आहे. २३ एप्रिलला मुंबई पोलिसांनी खोटी एफआयआर दाखल केल्याचेही सोमय्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. याआधी सकाळी किरीट सोमय्यांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्याबाबतची माहिती देण्यासाठी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांची वेळ घेतली होती. सोमय्यांच्या अध्यक्षतेत भाजपचे शिष्टमंडळ केंद्रीय गृह सचिवांना भेटले. शिष्टमंडळात आ. मिहिर कोटेचा, आ. अमित साटम, आ. पराग शाह, आ राहुल नार्वेकर, विनोद मिश्रा आदींचा समावेश होता. त्यानंतर शिष्टमंडळाने केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांचीही भेट घेतली. गृहराज्य मंत्री (GOI) नित्यानंद राय यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला शिवसेनेकडून सत्तेचा दुरुपयोग आणि भाजप नेत्यांवर हल्ले थांबवण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे आश्वासन दिले असल्याचे ट्विट सोमय्यांनी केले आहे.

याआधी किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि तीन नगरसेवकांना मुंबईच्या खार पोलिसांनी अटक केली होती. पण त्यानंतर जामीनावर त्यांची सुटकाही करण्यात आली. या प्रकरणात खार पोलिसांनी महाडेश्वर यांना जामीनही मंजूर केला आहे. महाडेश्वर यांच्यासोबतच शिवसेनेच्या तीन माजी नगरसेवकांनाही अटक करण्यात आली होती. त्यांनाही पोलिसांनी जामीन मंजूर केला आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक दिनेश कुबल, शेखर वायंगणकर, हाजी आलम यांनाही अटक करण्यात आली होती.


 

First Published on: April 25, 2022 10:29 PM
Exit mobile version