मुंबईत कोळी महिलांवर उपासमारीची पाळी, परप्रांतीय भैय्ये विकतायत रस्त्यांवर मासळी!

मुंबईत कोळी महिलांवर उपासमारीची पाळी, परप्रांतीय भैय्ये विकतायत रस्त्यांवर मासळी!

संकटकाळात मुंबई सोडून गेलेले परप्रांतीय श्रमिक लाखोंच्या संख्येने पुन्हा मुंबईत परतू लागले आहे. तसेच त्यांनी अवैध पध्दतीने मुंबईच्या रस्त्यावर मासळी बाजार सुरु केला आहे. त्यामुळे अधिकृत मासळी बाजारात ग्राहक येत नसल्यामुळे त्याचा फटका मराठी कोळी महिलांच्या व्यवसायावर पडला आहे. यासंबंधित तक्रार करुनही प्रशासनाला जाग येत नाही. मुंबई महानगरपालिका यांना अभय देण्याचे काम करत असल्याने मुंबईतील मराठी कोळी महिलांना उपासमारीची पाळी आली आहे.

अवैध मासळी बाजार कोळ्यांच्या मुळावर

कोरोनाच्या संसर्गामुळे देशभरात 23 मार्चपासून टाळेबंदी करण्यात आली होती. यादरम्यान अनेकांच्या हाताला काम नसल्यामुळे आणि कोरोनाच्या भीतीने लाखोंच्या संख्येने मुंबईतील परप्रांतीय श्रमिक आपल्या गावाकडे गेले होते. मात्र, आता अनलॉकची सुरुवात होताच मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नागरिक पुन्हा मुंबईत परतले आहेत. काम नसल्याने त्यांनी वाडीबंदर रोडवर अवैध पध्दतीने मुंबईच्या रस्त्यावर मासळी बाजार सुरू केला आहे. त्याचा फटका अधिकृत असलेल्या बाबू गेनू मासळी बाजार, डोंगरी मासळी बाजार आणि मांडवी मासळी बाजाराला बसला आहे. वाडीबंदर येथे भर रस्त्यावर सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अवैधरित्या मासळी बाजार भरतो. या मासळी बाजारात मासे विक्रेत्यांमध्ये बंगाली, हैद्राबादी तसेच भैय्यांची मोठी संख्या आहे. हे परप्रांतीय नागरिक बर्फात साठवून ठेवलेल्या पापलेट, बोंबिल, बांगडा, सुरमई, कोलंबी, चिंबोर्‍या, घोळ, तामोशी, रावस असे शिळे मासे स्वस्त दरात विक्री करत आहेत. त्यामुळे ताजे मासे विक्री करणार्‍या कोळी महिलांकडे ग्राहक येत नाहीत. गेल्या दोन महिन्यांपासून परप्रांतीय लोकांचा सर्रासपणे हा अवैध व्यवसाय सुरू आहे. मात्र, यावर मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस प्रशासन डोळेझाक करत असून यांना परप्रांतीयांकडून हप्ता जात असल्याचा आरोप कोळी महिलांकडून करण्यात येत आहे.

आगोदरच लॉकडाउनमुळे आमचे संसार रस्त्यावर आले आहे. आता अनलॉकमध्ये आमच्या मासे विक्रीचा व्यवसाय सुरु झालेल्या आहे. मात्र या परप्रांतीय भैया आणि बंगाली लोकांचा मनमानी कारभारामुळे आमच्याकडे ग्राहक नाही. दररोज 5 हजार रुपयांची मासे विक्री सुध्दा होत नाही. कर्जा डोगर वाढत जात आहे. शासनाने यांची दखल घेतली नाही तर आम्हा उपाशी मरावे लागेल.
-कौशल्या नाकवा,कोळी महिला

मनसे स्टाईलने देणार उत्तर?

भायखळा विधानसभा क्षेत्राचे मनसे माध्यम प्रसिध्दी प्रमुख कपिल पाटील यांनी दैनिक ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले की, लॉकडाऊनमुळे मासळी बाजार बंद होते. मात्र, आता अनलॉकची सुरुवात होताच मासळी बाजार सुरू झालेला आहे. मात्र, परप्रांतीय नागरिक अवैधरित्या भर रस्त्यावर शिळे मासे स्वस्त दरात विक्री करत असल्यामुळे अधिकृत मासळी बाजारात ग्राहक येत नाहीत. त्यामुळे मराठी कोळी महिलांवर उपासमारीची पाळी आली आहे. यासंबंधित आम्हाला तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. ही बाब आम्ही स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आणून दिली आहे. मात्र, तरी सुध्दा हा अवैध व्यवसाय बंद झालेला नाही. त्यामुळे जर येत्या काही दिवसांत हा अवैध व्यवसाय थांबवला नाही तर आम्ही येणार्‍या काळात मनसेस्टाईल यांना उत्तर देऊ. याला प्रशासन जबाबदार असणार आहे.

आम्ही शासनाकडून लायसन्स काढून गेल्या 25 वर्षांपासून मासळी बाजारात मासे विक्री करतो आहोत. मात्र, बंगाली आणि परप्रांतीयांच्या अवैध मासे विक्रीमुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे. एकीकडे सरकार भूमीपुत्रांना नियम दाखवता आणि दुसरीकडे परप्रांतीयांना अवैध व्यवसाय करण्यासाठी आश्रय देतात हा कसला न्याय ? या संबंधित आम्ही तक्रार केली आहे.
नईमउद्दीम खतीब, सचिव, बाबू गेनू मासळी बाजार
First Published on: September 20, 2020 6:21 PM
Exit mobile version