भैय्या हटाव, कोळी बचाव!

भैय्या हटाव, कोळी बचाव!

‘भैय्या हातपाय पसरी’, या नाटकात दाखवल्याप्रमाणे मुंबईत आलेले परप्रांतीय भैय्ये प्रत्येक क्षेत्रात हातपाय पसरत असून त्यांचे हे हातपाय पसरणे मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या कोळी बांधवांच्या मुळावर येत आहे. दहा वर्षांपूर्वी मुंबईत कोळी महिलांनी आक्रमक होऊन ‘भैय्या हटाव’चा नारा दिला होता. तोच नारा आता त्यांनी पुन्हा देऊन भैय्यांना हटवण्यासाठी हातात कोयता घेतला आहे. भैय्यांमुळे कोळी भगिनींच्या परंपरागत मासेविक्रीवर गदा येत आहे. परप्रांतीय मासेविक्रेते भल्या पहाटे होलसेलमध्ये मासळी विक्री करणार्‍या ठिकाणांवर जाऊन मासे घेतात आणि कमी भावात गिर्‍हाईकांना विकतात. आगामी निवडणुका लक्षात घेता सर्वच राजकीय पक्षांनी फक्त निवडणुकीपुरता हा विषय अजेंड्यावर घेऊ नये अशी अपेक्षा कोळी भगिनींची आहे.

त्यानंतर दारोदारी जाऊन मासे विकतात. लोकांना थोड्या कमी भावात घरबसल्या मासे मिळत असल्यामुळे वेळ वाचतो. त्यामुळे मासळी बाजारात जाणार्‍या लोकांचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी तेथील कोळी भगिनींवर गिर्‍हाईकांची वाट पाहत बसावे लागत आहे. गिर्‍हाईकांची संख्या अत्यंत कमी झाल्यामुळे त्यांचा धंदा बसण्याची वेळ आली आहे. भैय्यांच्या घुसखोरीमुळे कोळी बांधवांच्या पोटावर पाय येऊ लागल्यामुळे त्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मुंबई महापालिकेच्या 108 मंडयांमध्ये तसेच काही खासगी मंडयांमध्ये कोळी भगिनी मासळी विक्रीचा व्यवसाय करतात. असे असले तरी गेल्या काही वर्षांपासून परप्रांतीय मासे विक्रेत्यांमध्येही वाढ झालेली आहे. परप्रांतीय मासे विक्रेत्यांना महापालिकेच्या तसेच खासगी मंडयांमध्ये प्रवेश नाही. त्यामुळे ते दारोदारी फिरुन मासेविक्री करतात. परप्रातियांचा मासे विक्रीचा धंदा तेजीत आहे. घरबसल्या मासे मिळत असल्याने लोकही मंडईत फिरकत नाहीत. त्यामुळे कोळी भगिनी हतबल झाल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी ताडदेव परिसरातील मंडईपासून काही अंतरावर मासेविक्री करणार्‍या परप्रांतीय मासे विक्रेत्यांचे टब फेकून देत त्यांना चोप देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी तेथून पोबारा केला. एवढ्यावरच या कोळी भगिनी थांबल्या नाहीत तर त्यांनी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. याचा निषेध म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

अखिल भारतीय कोळी महासंघाच्या नेतृत्वाखाली ‘भैय्या हटाव’ आंदोलन पुन्हा एकदा हाती घेण्यात आले आहे. यापुढे नाखवांनी परप्रांतियांना मासेविक्री करू नये, असा ठराव महासंघाने केला आहे. महापालिकेच्या आणि खासगी मंडयांमध्ये मासळी बाजार भरवला जातो. मंडयांमध्ये कोळी भगिनी महानगरपालिकेला शुल्क भरून व्यवसाय करतात. त्यामुळे या व्यवसायाला महापालिका तसेच सरकारने संरक्षण द्यायला हवे. परंतु तसे न होता महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडवणार्‍या भैय्यांवर कारवाई केली जात नाही, अशी खंतही कोळी भगिनींनी व्यक्त केली आहे. मुंबई ही कोळ्यांची म्हटली जाते. परंतु मासे विक्रीचा धंदा करण्यापासून परप्रांतीय भय्यांना रोखण्याची गरज आहे, अन्यथा मुंबई परप्रांतियांची होईल, अशी भीती कोळी भगिनींनी व्यक्त केली.

…तर मासे विक्रीचा व्यवसाय भैय्यांच्या ताब्यात जाईल!
मासळी विक्रीच्या व्यवसायावर परप्रांतीय मासे विक्रेत्यांकडून अतिक्रमण झाले आहे. परिणामी कोळी महिलांची मासेविक्री कमी होऊ लागली आहे. महापालिकेला कोणतेही शुल्क किंवा कर न भरता तसेच स्वच्छतेचे सर्व नियम पायदळी तुडवून परप्रांतीय भैय्ये दारोदारी फिरुन मासे विकतात. त्यामुळे महापालिकेला शुल्क भरून तसेच सर्व नियमांचे पालन करूनही कोळी भगिनींची मासेविक्री होत नाही. मंडईतील मासळी बाजार ओस पडू लागले आहेत. परिणामी येत्या काही वर्षांत मासळी विक्रीचा व्यवसाय परप्रांतियांच्या ताब्यात जाईल.
-नयना पाटील, महिला प्रमुख, अखिल भारतीय कोळी महासंघ.

First Published on: December 26, 2018 7:00 AM
Exit mobile version