एक पूर्ण अपूर्ण!

एक पूर्ण अपूर्ण!

एक पूर्ण अपूर्ण!

पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण आज या जगात नसल्या तरी एक खंबीर प्रशासकीय अधिकारी, कामाच्या तणावात कुटुंबाला प्राधान्य देणारी आई, वास्तवाला भिडणारी लेखिका आणि संवेदशील कवीयत्री आपल्या समोर कायम उभ्या राहणार आहेत. ‘एक पूर्ण अपूर्ण’ या त्यांच्या आत्मचरित्र पुस्तकामधून त्यांच्या जीवनाशी दोन हात करण्याच्या धडाडी वृत्तीचे जे दर्शन घडते त्याने आपण थक्क होऊन जातो. एका मतिमंद मुलाची आई होऊन आपल्या नशिबी देवाने कोणते मोठे दुःख घातले याचा बाऊ न करता त्या शेवटपर्यंत लढत राहिल्या. सतत प्रशासकीय कामाचा तणाव असून बाई डगमगल्या नाहीत. मुख्य म्हणजे त्यांनी आपल्यात संवेदनशील माणूस कधी मरू दिला नाही. कदाचित त्यांना कोरोनाने गाठले नसते तर नीला यांच्या हातून आणखी काही मोठी सामाजिक कामे झाली असती. मुख्य म्हणजे त्यांची लेखणी वाहती राहून ‘एक पूर्ण अपूर्ण’चा आणखी खोल डोहात जाऊन आपल्याला वेध घेता आला असता… पण, नियतीला ते मान्य नव्हते!
‘एक पूर्ण अपूर्ण’ मधून नीला यांच्यातील संवेदनशील, खंबीर आईचे आणि धडाडीच्या, साहसी स्त्रीचे दर्शन घडते. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या स्वानुभव आहे. एका कुटुंबाने दिलेल्या अग्निदिव्याच्या परीक्षेची कथा आहे. मतिमंद मुलाच्या आईवर झालेला आघात आणि त्या आघातातून सावरताना तिने दाखविलेल्या धैर्याची, प्रगल्भतेची जाणीव या कहाणीतून होते. चैतन्यचा जन्म होतो आणि कुटुंबाचे सारे जीवनच बदलून जाते. तो शरीराने दिसतो, वाढतो सामान्य मुलासारखा. पण त्याची बौद्धिक वाढ त्याला विशेष ठरविते. चैतन्यचे बालपण, संगोपन, शाळा, त्याची प्रगती, यासंबंधी एका आईच्या नजरेतून वाचायला मिळते. अपुरेपणावर मात करून त्याला उमेदीने जगायला शिकवतानाच समाजाकडून अगदी डॉक्टरांकडून मिळवलेल्या अव्हेलनेचे चित्रणही पुस्तकात दिसते. या पुस्तकाच्या दहा आवृत्त्या निघाल्या असून वाचकांच्या काळजात या पुस्तकाला एक विशेष स्थान आहे.
कोरोनाच्या काळात त्या आपली आणखी घुसमट झाल्याच्या म्हणत होत्या. आपल्या मतिमंद मुलाला बाहेरच्या जगाची कल्पना नाही आणि नेहमीप्रमाणे आपल्याला बाहेर थोडा वेळ फिरता येत नाही, यामुळे तो सैरभैर झाल्यासारखा दिसतो तेव्हा एक आई म्हणून माझे काळीज तुटते, अशी एक पोस्ट नीला यांनी काही दिवसांपूर्वी टाकली होती. आणि नियतीचा खेळ म्हणा किंवा काय त्यांचे सर्व कुटुंब कोरोनाबाधित झाले. कोरोनाशी त्या आपल्या नेहमीच्या झुंजार स्वभावानुसार दोन हात करतील, पण त्यांना शेवटी मृत्यूने गाठले. मुलगा चैतन्यची त्या शेवटपर्यंत काळजी घेत होत्या. खूप जीव होता त्यांचा मुलावर. नेहमीच्या प्रशासकीय काम झाले की जवळच्या लोकांसोबत त्या चैतन्यविषयी भरभरून बोलत. अशा मुलांची विशेष काळजी घेताना कशा आव्हानांचा मुकाबला करावा लागतो हे त्यांच्या तोंडून ऐकताना एका आईचे प्रेम प्रकर्षाने समोर यायचे. कदाचित हा पूर्ण अपूर्णाचा खेळ त्या बघत होत्या. शेवटी आपल्या परीने तो खेळ पूर्ण करूनच या जगाचा निरोप घ्यायचा असा निर्धार करून त्या जीवनाशी दोन हात करत होत्या. पण, कोरोनाने त्यांची झुंज अपूर्ण ठेवली…

आई-बाबांची शाळा (मार्गदर्शनपर),
आयुष्य जगताना, एक दिवस (जी)वनातला (अनुभवकथन)
एक पूर्ण – अपूर्ण (आत्मचरित्रपर)
ओळखीची वाट (कवितासंग्रह)
जाळरेषा (प्रशासकीय सेवेतील अनुभव), टाकीचे घाव
डेल्टा १५ (प्रवासवर्णन)
तिढा (कादंबरी), तुझ्याविना (कादंबरी), पुनर्भेट (अनुभवकथन)
मी क्रांतिज्योती (अनुभवकथन)
मैत्र (ललित लेख), रात्र वणव्याची (कादंबरी), सत्य-कथा (व्यवसाय मार्गदर्शन) या पुस्तकांसोबत त्यांनी
आकाश पेलताना, आषाढ मेघ,
मातीची मने हे कविता संग्रह लिहिले.

खंबीर प्रशासकीय अधिकारी असून नीला यांच्यातल्या माणूस शेवटपर्यंत जिवंत राहिला तो लेखिका आणि कवीयत्री अशा संवेदनशील माणसामुळे. म्हणूनच त्या आपल्याला भेटलेल्या माणसांवर अधिक गहिरे होत लिहीत राहिल्या. राज्याच्या पहिल्या निवडणूक आयुक्त ते धारावीची जबाबदारी तसेच वनविभाग सांभाळताना त्यांनी कायम सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवला. म्हणूनच त्यांच्या हातून चांगले काम होऊ शकले. हीच माणसे त्यांच्या पुस्तके आणि कवितांमधून आपल्याला दिसली. पण आताच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे काम पाहून त्या निराश दिसत. ‘आज काही सनदी अधिकारी आपले काम सोडून इतर कामांमध्ये जास्त लक्ष घालताना दिसतात. ते बरोबर नाही. त्यांनी आपल्या जबाबदारीला न्याय दिला पाहिजे’. याला सुद्धा कदाचित त्या अपूर्ण खेळाची काळी किनार असेल…

 

First Published on: July 16, 2020 11:04 AM
Exit mobile version