वाहन चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला कुर्ला पोलिसांकडून अटक

वाहन चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला कुर्ला पोलिसांकडून अटक

कुर्ला पोलिसांकडून अटक करण्यात आलेला आरोपी

वाहन चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला कुर्ला पोलिसांनी अटक केली आहे. सदर चोर महागड्या गाड्या चोरून त्या विकायचा. हजरतअली फकरुद्दीन खान, वय ३२ वर्षे असे या चोरट्याचे नाव असून तो कुर्ल्याच्या हलावपुल जवळ वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सदर चोरटा कुर्ला परिसरात चोरी केलेल्या गाडीसह येणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्याप्रमाणे सापळा रचून त्याला १२ तारखेला अटक केली असून त्याच्यासोबत दादरच्या आवारातून चोरी केलेली एक बोलेरो गाडीसुद्धा जप्त करण्यात आली आहे.

पाच गाड्या केल्या जप्त

पोलिसांनी रिमांडवर घेतले असता त्याने आपल्या चोऱ्यांचा पाढाच वाचला. त्याने आतापर्यंत वॅगनॉर, सेंट्रो, शेवरोलेट इन्जॉय, मारुती डिझायर आणि महिंद्रा पिकअप अश्या महागड्या गाड्या चोरल्या होत्या. पोलिसांनी पाचही गाड्या हस्तगत केल्या असून त्यांची एकूण किंमत १४ लाख ५० हजार इतकी आहे. सदर आरोपी हा अट्टल चोरटा असून अनेक दिवसांपासून पोलीस याचा शोध घेत होते. अखेर कुर्ला पोलिसांच्या कौशल्याने त्याला बेड्या ठोकण्यात यश आले आहे. अधिक तपासासाठी हे प्रकरण गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाकडे सोपवण्यात आले असून मालमत्ता विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली आहे, यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

आझाद नगर पोलिसांचीही कारवाई

दरम्यान काही दिवसांपूर्वी आझाद नगर पोलासांनी अश्याच प्रकारची कारवाई करत गाड्या चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली होती. ही टोळी लोकांच्या गाड्या चोरी करुन त्यांचे नंबरप्लेट आणि चेसी नंबर बदलून तीच गाडी दुसऱ्याला विकत होती. सध्या मुंबईमध्ये गाड्या चोरीचे  प्रमाण वाढत आहे, त्यांमुळे अश्या टोळ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत.

First Published on: July 18, 2018 6:38 PM
Exit mobile version