महिला प्रवाशांना ‘रेल रोको’ पडला महागात

महिला प्रवाशांना ‘रेल रोको’ पडला महागात

नुकतेच दिव्या रेल्वे स्थानकांवर महिला प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केले, मात्र हे आंदोलन या महिला प्रवाशांना चांगलेच महागात पडले आहे. या आंदोलनप्रकरणी आरपीएफ पोलिसांनी मंगळवारी सहा जणींना पकडून त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर कल्याण रेल्वे कोर्टाने त्यांच्यावर प्रत्येकी एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करून त्यांना सोडून दिले.

गुरुवारी सकाळी सीएसएमटीकडे जाणारी 6 वाजून 56 मिनिटांची लोकल दिव्यात आल्यावर पहिल्या डब्यात आधीपासूनच दरवाजा अडवून उभ्या असलेल्या महिला प्रवाशांनी दिवा स्थानकातून गाडीत चढू पाहणार्‍या महिला प्रवाशांना चढू न दिल्याने संतप्त झालेल्या दिव्यातील महिला प्रवाशांनी लोकलच्या दरवाजात उभे असलेल्या महिलांना खाली खेचण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी मोटरमनने गाडी सुरू केल्याने त्याला थांबायला सांगत काही महिला रुळावर उतरल्या. या प्रकरणी दिवा आरपीएफ पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे आठ ते दहा अनोळखी महिलांवर गुरुवारीच गुन्हे दाखल केले. त्यानंतर व्हिडिओपासून सर्वांची ओळख पटण्याचे काम सुरू केल्यावर सहा महिलांची ओळख आरपीएफ पोलिसांना पटली. त्यानुसार शुक्रवारी सकाळी १० वाजता पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली.

मात्र, त्या सोमवारपर्यंत हजर राहिल्या नाहीत. त्यानंतर त्या सगळ्या जणी मंगळवारी सकाळी पोलीस ठाण्यात आल्यावर त्यांना अटक करून कल्याणच्या रेल्वे कोर्टात न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. तसेच त्यांचा गुन्हा सांगून तो कबूल असल्यास प्रत्येकी 1 हजार रुपये दंडाची कारवाई सहा जणींवर करून त्यांना सोडण्यात आले.

First Published on: April 12, 2019 4:31 AM
Exit mobile version