अहमदाबाद-मुंबई तेजस एक्स्प्रेसला उशीर

अहमदाबाद-मुंबई तेजस एक्स्प्रेसला उशीर

देशातील दुसरी खासगी तेजस एक्स्प्रेस अहमदाबाद-मुंबई मार्गावर धावण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या तेजस एक्सप्रेसला तिसर्‍याच दिवशी दीड तासांचा लेटमार्क लागला. परिणामी इंडियन कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम महामंडळाने (आयआरसीटीसी)या एक्स्प्रेसने प्रवास करणार्‍या तब्बल 630 प्रवाशांना प्रत्येकी 100 रुपये आर्थिक नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला.

बुधवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास दहिसर ते भाईंदर दरम्यानच्या अप जलद मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला. परिणामी गाड्यांचा विद्युत पुरवठा बंद झाला. दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास दहिसर ते मीरा रोड दरम्यानचा ओव्हरहेड वायरमधील विद्युत पुरवठा सुरळित करण्यात आला. परंतु, मीरा रोड ते भाईंदर दरम्यानचा विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी दीड वाजला. या बिघाडामुळे मुंबईकडे येणार्‍या लांब पल्ल्याच्या 4 गाड्यांना विलंब झाला . तर उपनगरीय मार्गावरील लोकलच्या 8 फेर्‍या रद्द कराव्या लागल्या.

तेजस एक्स्प्रेस अहमदाबादहून सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी सुटून मुंबई सेंट्रलला दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी पोहोचते.तर परतीच्या प्रवासासाठी दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी निघालेली, तेजस रात्री 9 वाजून 55 मिनिटांनी अहमदाबादला पोहोचते.

प्रवासी खोळंबले

बुधवारी दुपारी झालेल्या बिघाडामुळे मुंबईत येणारी तेजस एक्सप्रेस खोळंबली. परिणामी 1 तास 30 मिनिटांचा विलंब तेजसला झाला. या गाडीने प्रवास करणार्‍या चार प्रवाशांच्या विनंतीनुसार अंधेरी स्थानकात एक्सप्रेसला 2 मिनिटांचा थांबा देण्यात आला. तर काही प्रवाशांनी गाडीला विलंब झाल्याने त्यांचे पुढील प्रवासाचे विमान चुकल्याचे सांगितले.

First Published on: January 23, 2020 2:21 AM
Exit mobile version