खासगी तेजसमध्ये दिसणार रेल्वे सुंदरी……

खासगी तेजसमध्ये दिसणार रेल्वे सुंदरी……

विमानासारख्या अत्याधुनिक सुविधा आता रेल्वेतसुद्धा मिळणार आहेत. त्याची सुरुवात आयआरसीटीसीच्या माध्यमातून चालविण्यात येणार्‍या खासगी तेजस एक्स्प्रेसने होणार आहे. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे विमानात प्रवाशांच्या सेवेसाठी हवाई सुंदरी तैनात असतात त्याच धर्तीवर आता या खासगी रेल्वे गाड्यांमध्ये रेल्वे सुंदरी प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असणार आहेत.

भारतीय रेल्वेच्या इतिहासात इंग्रजांच्या काळानंतर खासगी रेल्वे धावणार आहे. ही पहिली खासगी रेल्वे आयआरसीटीसी घेऊन येत आहे. भारतीय रेल्वे विभागाकडून आयआरसीटीसीला दोन तेजस एक्स्प्रेस चालविण्यासाठी सपुर्द करण्यात आल्या आहेत. पहिली एक्सप्रेस ऑक्टोबर महिन्यात दिल्ली ते लखनौ आणि दुसरी तेजस नोव्हेंबर महिन्यात मुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावणार आहे. विमानासारख्या अत्याधुनिक सुविधा या खासगी रेल्वेत देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे भारतीय रेल्वेतील पहिल्या खासगी एक्सप्रेसमध्ये विमानासारख्या हवाई सुंदरी तेजस एक्सप्रेसमध्ये दिसणार आहेत. प्रवाशांचे त्या स्वागत करतील. सोबतच या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुविधांसाठी तत्पर असतील. यापूर्वी भारतीय रेल्वेने 2016 साली गतिमान एक्सप्रेस ही  ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हासुध्दा रेल्वेत हवाई सुंदरींसारख्या रेल्वे सुंदरी या गाडीत असतील,अशी चर्चा होती. मात्र ते शक्य होऊ शकले नाही. प्रवाशांच्या सेवेसाठी आयआरसीटीसी महिला कर्मचार्‍यांची भरती करणार आहे,अशी माहिती नाव न सागण्यांच्या अटीवर आयआरसीटीसीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

लवकर होणार बुकिंग सुरु
पहिली खासगी तेजस एक्स्प्रेस ऑक्टोबर महिन्यात धावणार आहे. ही गाडी दिल्ली ते लखनौ मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण आणि बुकिंग आयआरसीटीच्या संकेत स्थळावर लवकरच उपलब्ध होणार आहे. आयआरसीटीसीच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिन्याचा अखेरीस खासगी तेजसचे बुकिंग सुरु होणार आहे.

प्रवाशांना मिळणार प्रवासात नि:शुुल्क विमा
खासगी तेजस एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना 25 लाख रुपयांपर्यत नि:शुल्क विमा मिळणार आहे. या एक्स्प्रेसचे प्रवासी भाडे कमीतकमी प्रति प्रवासी 2 हजार 500 रूपये असणार आहे.आयआरसीटीसीपूर्वी पासून प्रवाशांना उत्तम सुविधा देण्यासाठी ओळखली जाते. तेजस एक्सप्रेसमध्ये त्या सुविधा दिसणार आहेत.

First Published on: September 14, 2019 5:20 AM
Exit mobile version