दरबारी नेत्यांमुळे ‘मातोश्री’ अडचणीत; युवा सेनेच्या शिलेदारांचाही कोंडाळा!

दरबारी नेत्यांमुळे ‘मातोश्री’ अडचणीत; युवा सेनेच्या शिलेदारांचाही कोंडाळा!

सचिन वाझे प्रकरणामुळे ठाकरे सरकारला धोका निर्माण झाला आहे, असे चित्र दिसत असले तरी सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भोवती असलेल्या दरबारी नेत्यांमुळे मातोश्री वारंवार अडचणीत आल्याचे समोर येत आहे. शिवसेनेतील अ‍ॅड. अनिल परब, सुभाष देसाई, अनिल देसाई, प्रियांका चतुर्वेदी तसेच युवा सेनेतील वरूण सरदेसाई, सुरज चव्हाण आणि राहुल कनल यांच्या सल्ल्याने राज्य कारभार चालवला जात आहे, अशी माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे राजकीयदृष्ठ्या अतिशय सजग असलेले खासदार, नेते संजय राऊत, नगरविकास मंत्री आणि नेते एकनाथ शिंदे, अडचणीच्या काळात नेहमी धावून येणारे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांना दोन हात दूर ठेवण्यात मुख्यमंत्र्यांभोवतीचे आभासी नेते यशस्वी झाले आहेत. मात्र, त्यामुळे शिवसेनेचे अतोनात नुकसान झाले आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेनेत पुन्हा एकदा अनिल परब यांचे महत्व वाढले आहे. संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत आणि रवींद्र वायकर यांचे मंत्रिपद निश्चित झाल्यानंतर अचानक त्यांचा पत्ता कट करून परब यांच्याकडे परिवहन खाते देण्यात आले. याशिवाय संसदीय कार्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सर्वात आपणच जवळ असल्याची त्यांची धडपड सुरू झाली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री अनेक महत्वाचे निर्णय आपल्याशी सल्लामसलत करून घेतात, असे चित्र निर्माण करण्यात अनिल परब यशस्वी ठरले.

यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री मुख्यमंत्र्यांपर्यंत जाण्यासाठी अनिल परब यांच्या मध्यस्तीचा उपयोग करू लागल्याने गेले काही महिने त्यांचे महत्व अचानक वाढले आहे. शिवाय मंत्र्यांच्या निरोपासाठी परब हाच एकमेव मार्ग असल्याचे दाखवण्यात आले. याचवेळी मुख्यमंत्री कार्यालयातही परब यांचे वजन वाढल्याने तेच प्रमुख समन्वयक असल्याचे चित्र तयार झाले आहे, असे बोलले जाते. मुंबई पोलीस दलातील आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्यांसाठी परब यांचा शब्द अंतिम होता. त्यामुळेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवार यांच्याकडे गृह विभागात परब यांचा हस्तक्षेप वाढल्याची तक्रार केली होती.

याचवेळी सत्ता येण्याआधी मुख्यमंत्र्यांसोबत सावलीसारखे असणारे आणि अनेक महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत असणारे मिलिंद नार्वेकर यांचे महत्व आपोआप कमी झाले. तसेच राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जाणारे, शिवाय महाविकास आघाडी सत्तेत आणण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, अशा मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांना राज्य कारभार सल्ला मसलतीत फारसे महत्व देण्यात येत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदेनाही महत्वाच्या निर्णयात सामावून न घेता त्याऐवजी वरूण सरदेसाई, सुरज चव्हाण, राहुल कनाळ यांना महत्व दिले जात आहे असेही सेनेतील जुने नेते खासगीत सांगतात.

तर सुभाष देसाई, अनिल देसाई यांच्याबरोबर शिवसेनेत नव्याने आलेल्या प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर यांना महत्व मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबईची तीच दरबारी मंडळी आलटून पालटून उद्धव ठाकरे यांच्या जवळ असून गामीण भागात शिवसेना मोठी करण्यात कष्ट घेणारे शिवसेना नेत्यांना मात्र सत्ता समीकरणात अजूनही फारसे महत्व नसल्याने शिवसेनेचा चेहरा राज्यभर व्यापक होत नसल्याचे वास्तव आहे. जुन्या नेत्यांप्रमाणे रवींद्र वायकर, सुनील प्रभू, प्रताप सरनाईक या शिलेदारांना केवळ नावापुरते जवळ करत असल्याने नाराजी वाढली आहे.

First Published on: March 23, 2021 10:19 PM
Exit mobile version