LockDown : परप्रांतियांसाठी लोकलला इंजिन लावून गाड्या सोडा

LockDown : परप्रांतियांसाठी लोकलला इंजिन लावून गाड्या सोडा

मुंबईत लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतिय अडकून पडले असून त्यांच्यासाठी विशेष गाड्या सोडून त्यांना गावी पाठवण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे. परंतु आपल्या राज्यात तसेच गावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने याचा ताण रेल्वे वाहतुकीवर पडणार असून यासाठी असलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्याही कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परप्रांतियांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी मुंबईतील लोकल गाड्यांना इंजिन लावून सोडण्याची सूचना करत या तांत्रिक बाबींचा विचार रेल्वे प्रशासनाने करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. परप्रांतियांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी शिवसेनेने केलेल्या सुचनेचा विचार करत त्याची अंमलबजावणी केल्यास कुठल्याही प्रकारचा गोंधळ उडणार नाही आणि गावी जाण्याची सेवा योग्यप्रकारे परप्रांतियांसह राज्यातील विविध जिल्ह्यातील लोकांना मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेचे नामनिर्देशित नगरसेवक आणि शिवसेना प्रवक्ते अरविंद भोसले यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पश्चिम रेल्वेच्या महाप्रबंधकांना पत्र लिहून लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांची आणि बाहेर गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने लोकल ट्रेनला इंजिन लावून काही कालावधीकरता लोकलचा वापर करावा. जेणेकरून या प्रवासादरम्यान कोणतीही दुर्दैवी घटना घडणार नाही असे म्हटले आहे.

स्थानकांच्या कोट्यानुसार आरक्षित तिकीटांचे बुकींग

या पत्रांमध्ये त्यांनी लॉकडाऊन काळात ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग सोबत मुंबई, ठाणे, पुणे  येथील प्रत्येक रेल्वे स्टेशनवर ज्याप्रमाणे पूर्वी  विशिष्ट संख्या कोटा उपलब्ध  दिला जायचा,त्याप्रमाणेच  आसन व्यवस्था निश्चित करून त्याप्रमाणे अर्जाद्वारे कुठे, कधी, किती लोकांना जायचे याची माहिती मागवून तात्काळ आरक्षित तिकीट विकले जावे. यामुळे मोफत प्रवास टाळता येईल आणि अशाप्रकारे  नियोजन केल्यास लाखो लोकांच्या या प्रवासी लोंढ्यावर नियंत्रण ठेवता येईल. आणि पर्यायाने संभाव्य मनुष्य हानी टाळता येईल तसेच अथवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.

जनरल डबा बंद करावा

कोरोनासंदर्भातील परिस्थिती सामान्य झाल्यावर नेहमी प्रमाणे रेल्वे प्रवासी वाहतूक करावी. काही दिवस आरक्षित रेल्वे तिकिट (कन्फर्म रेल्वे तिकीट) शिवाय प्रवासाची परवानगी कुणाला देऊ नये. तसेच जनरल डब्बा काही दिवस बंद करावा अशी सूचना त्यांनी केली. जर जनरल डबा सुरु ठेवल्यास या डब्यातून प्रवास करायला मिळेल म्हणून अनेक लोक अचानक रेल्वे स्टेशन वर येतील आणि गोंधळ उडेल अशीही भीती त्यांनी याद्वारे व्यक्त केली आहे. ज्या प्रमुख शहरात रेल्वे पाठवायची आहे ती त्याच शहरांत सुटल्यावर थेट जाईलअसे नियोजन करावे . पण या रेल्वे मध्ये आधीच्या शहरातील प्रवाशांना प्रवेश देऊ नये. ज्यामुळे पुढे रेल्वे मोकळ्या जाणार नाहीत, कमी  कालावधीत अधिक रेल्वे च्या फेऱ्या होतील,अशीही सूचना त्यांनी केली आहे.

कमीत कमी साहित्यासोबत प्रवास

रेल्वेकडे उपलब्ध असणारी अतिरिक्त विशेष रेल्वे इंजिन लोकल रेल्वे बाहेरगावी पाठवण्यासाठी वापरल्यानंतर उर्वरित लोकल शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी वापरता येतील. रेल्वेत प्रवास करताना कमीत कमी साहित्य, सोबत आवश्यक औषधे, ओळखपत्र घेऊन अशा प्रवाशांना संबंधित रेल्वे स्टेशन बाहेरच तपासणी करावी आणि ज्यांच्याकडे प्रवासाची तिकिटे आहेत. त्यांनाच त्या त्या रेल्वे स्टेशनवर रांगेने प्रवेश द्यावा,अशीही सूचना केली आहे.

मुंबई, ठाणे, कल्याण, पनवेल, पुणे या शहरातील सर्व रेल्वे स्टेशनचा बाहेरगावातील प्रवासी रेल्वेने जाण्यासाठी वापर करावा. जसे की गुजरात, राजस्थान, दिल्ली, पंजाब, इत्यादी राज्यातील प्रमुख शहरांत जाण्यासाठी चर्चगेट ते विरार दरम्यान प्रत्येक दिवशी गाड्या सोडाव्यात. अशाचप्रकारे उत्तर महाराष्ट्र सह विदर्भ आणि उत्तर भारत येथील झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पूर्वेकडील पश्चिम बंगाल, ओरिसाकडे जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण, कसारा. नाशिक येथील सर्व स्टेशनचा वापर तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे, कल्याण, कर्जत, पनवेल, पुणे येथून कोकणसह दक्षिण भारत येथे जाण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्टेशन वरून कोणत्या दिवशी, किती वाजता, कोणत्या शहरांत बाहेर गावी जाणारी एक्सप्रेस रेल्वे अथवा विशेष इंजिन लावलेली लोकल रेल्वे प्रवाश्याना घेऊन जाणार त्याची प्रसिद्धी करावी. प्रत्येक रेल्वे  स्टेशनवर पूर्वी प्रमाणे फॉर्म द्वारे प्रवासाची रक्कम घेऊन रेल्वे तिकिटे आरक्षित करावीत, असेही या पत्रात अरविंद भोसले यांनी म्हटले आहे.

First Published on: May 1, 2020 10:46 PM
Exit mobile version