प्लास्टिक सर्जरीची अद्भुत किमया, तुटलेला पंजा पुन्हा जोडला!

प्लास्टिक सर्जरीची अद्भुत किमया, तुटलेला पंजा पुन्हा जोडला!

कूपर रुग्णालय

आसामहून मुंबईत उदरनिर्वाहासाठी आलेल्या २७ वर्षीय तरुणाचा सुतारकाम करत असताना उजव्या पायाचा पंजा करवतीने कापला गेला होता‌. या अपघातादरम्यान त्याचा पंजा त्याच्या पायापासून पूर्णपणे वेगळा झाला. त्याला तात्काळ पालिकेच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू केले. त्याच दिवशी त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी देखील केली गेली. तब्बल ६ तासांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्याचा पाय पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

महिन्याभरानंतर तरुणाला डिस्चार्ज

जवळपास एक महिन्याच्या उपचारांनंतर या तरुणाला नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. लवकरच हा तरूण आपल्या पायावर उभा राहून चालू शकेल, असा विश्वास कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

अशा प्रकारच्या अपघातात हात – पाय किंवा एखादा बाह्य अवयव तुटला असेल तर त्या भागाचा रक्तप्रवाह थांबतो. तसंच तो अवयव पूर्णपणे निकामी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा परिस्थितीत रुग्णावर उपचार करताना प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. त्यामुळे आवश्यक उपचार तात्काळ होणं गरजेचं असतं.

डॉ. गणेश शिंदे, अधिष्ठाता, कूपर रुग्णालय

कूपर रुग्णालयात पहिल्यांदाच शस्त्रक्रिया

या तरुणाला तात्काळ उपचार आणि शस्त्रक्रियेची गरज होती. त्यानुसार उपचार सुरू करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर आणि शस्त्रक्रियेपूर्वी आवश्यक असलेल्या तपासण्या केल्यानंतर त्याच दिवशी शस्त्रक्रिया देखील सुरू करण्यात आली. या शस्त्रक्रियेदरम्यान कापल्या गेलेल्या रक्तवाहिन्यांचा दुसरा भाग शोधून तो जोडणे, कातडी जोडणे इ. बाबी करण्यात आल्या. तसेच उजव्या पायाच्या घोट्याला ही मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती. तिथे शस्त्रक्रियेदरम्यान धातूची पर्यायी पट्टी बसवण्यात आली आहे. कूपर रुग्णालयातील प्लास्टिक सर्जन डॉ. नितीन घाग यांच्या टीमने ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. कूपर रुग्णालयात अशा प्रकारची शस्त्रक्रिया पहिल्यांदाच झाली असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.


हेही वाचा – लॅरिंगो ट्रॅकियल रिकन्स्ट्रक्शन सर्जरीमुळे ‘तो’ ११ वर्षांनी बोलला

First Published on: November 1, 2018 12:10 PM
Exit mobile version