विधान परिषदेतील आमदार शिंदे गटात सामील, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

विधान परिषदेतील आमदार शिंदे गटात सामील, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

शिंद गटाकडून उद्धव ठाकरेंना धक्का देणे सुरूच आहे. अकोल्याचे माजी विधान परिषद आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि त्यांचे सुपुत्र विधान परिषद आमदार विप्लव बाजोरिया यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बाजोरिया शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, आज बाजोरियांनी शिंदे गटात मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात अधिकृत प्रवेश केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेसमोर अनेक आव्हाने आहेत. दररोज शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, माजी नगसेवक, जिल्ह्यातील प्रमुख नेते शिंदे गटात सहभागी होत आहेत. अकोल्यात शिवसेना आणि युवा सेनाला धक्का बसला आहे. मुंबईत अकोल्यातील माजी आमदारांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश घेतला.  दरम्यान, शिंदे गटात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये विधान परिषद माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, हिंगोली परभणीतील शिवसेनेचे विद्यमान विधानपरिषद आमदार विप्लव बाजोरिया, उपशहर प्रमुख, युवा सेनेचे अकोला जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप, माजी नगरसेवकांसह इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. बाजोरीया गटांकडून अनेकदा विद्यमान आमदार नितीन देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते.

दरम्यान बाजोरीया यांचे समर्थक मानले जाणारे माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, माजी नगरसेवक संतोष अनासने यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी सद्यस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या सेनेत राहणे पसंत केले आहे.

श्रीरंग पिंजरकरांचे आरोप –

श्रीरंग पिंजरकर यांनी अनेकदा विद्यमान शिवसेना जिल्हाप्रमुख तथा बाळापुर मतदारसंघाचे शिवसेना आमदार नितिन देशमुख यांच्यावर आरोप केले होते. अकोल्यात शिवसेना संपवण्यासाठी देशमुख हे भाजपला नेहमीचे मदत करतात. याबाबत अनेक तक्रारी पक्ष प्रमुखांकडे केल्या. मात्र, त्यावर अद्याप तोडगा निघाला नसल्याचे त्यांनी म्हटले होते. अकोला शिवसेनेतील वादाला विधान परिषद निवडणुकीतील पक्षाच्या लाजिरवाण्या पराभवाची किनार आहे, आमदार नितीन देशमुखांच्या दगाफटक्यांनीच तीनदा आमदार राहिलेल्या गोपीकिशन बाजोरियांचा पराभव झाल्याचा बाजोरिया गटाचा आरोप होता.

First Published on: July 29, 2022 10:21 AM
Exit mobile version