लोअर परळमधील वेश्या व्यवसायामुळे स्थानिक हैराण

लोअर परळमधील वेश्या व्यवसायामुळे स्थानिक हैराण

हनुमान गल्ली

मुंबईतील लोअर परेल परिसरातील हनुमान गल्ली या भागात गेल्या ४० वर्षांपासून अनधिकृत प्रकारे वेश्या व्यवसाय सुरू आहे. मात्र मागील एक वर्षांपासून इथून जाणारे स्थानिक एका भितीच्या दडपणााखालून वावरत आहेत. आता या ठिकाणाहून जाणार्‍यांना पादचार्‍यंना पकडून त्यांच्याकडून पैसे, दागिने लुटले जात आहेत. या प्रकारामुळे आता या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या भागात वेश्या व्यवसाय करणार्‍या महिला या सर्वाधिक बांगलादेशी आहेत. गेल्या 40 वर्षापासून या भागात परप्रांतिय महिला वेश्या व्यवसाय करत असून,सुरुवातीच्या काळात या परिसरात अनेक महिला हा व्यवसाय करत होत्या. मात्र आता जवळपास 50 महिला इथे हा व्यवसाय करत असून, आता या महिलांकडे येणार्‍यांचेही प्रमाण घटले आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या परिसरात येणारे इथे राहणार्‍या आजूबाजूच्या महिलांना देखील त्याच नजरेने पाहत असल्याने चांगल्या घरातील महिलांना देखील शरमेने मान खाली घालावी लागते, अशी प्रतिक्रिया या परिसरात राहणार्‍या महिलांनी दैनिक ‘आपलं महानगर’ला दिली.

विशेष म्हणजे याच हनुमान गल्लीला लागून 2017 साली सुसज्ज आणि सुंदर असे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यान बांधण्यात आले. मात्र याच उद्यानाला लागून असलेल्या गल्लीमध्ये हा व्यवसाय सुरु असल्यामुळे या उद्यानाकडे देखील रहिवांशांनी पाठ फिरवली आहे. दरम्यान हनुमान गल्लीमध्ये चालणार्‍या या व्यवसायाबद्दल मनसेचे शाखा अध्यक्ष मंगेश कसालकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना.म.जोशी मार्गचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना पत्र लिहून इथे चालणारा व्यवसाय कायम स्वरुपी बंद करावा, अशी मागणी केली आहे.

या प्रकरणी मनसे शनिवारी स्वाक्षरी मोहिम राबवणार होती, मात्र त्याआधीच ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांनी स्वाक्षरी मोहीम न राबवण्याची विनंती करत या प्रकरणी सविस्तर चर्चेला येण्याचे निमंत्रण मनसेचे शिष्टमंडळ आणि स्थानिक नागरिकांना केले आहे. त्यामुळे तुर्तास मनसेने स्वाक्षरी मोहीम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
– मंगेश कसालीकर, शाखा अध्यक्ष, मनसे

2017 पासून आम्ही या विषयी लढा देत आहोत. मात्र तात्पुरती कारवाई होते पुढे काहीच होत नाही. या परिसरात लुटमारीचे देखील प्रकार घडत आहेत. त्यामुळे महिलांसह पुरुषांमध्ये देखील भितीचे वातावरण पसरले आहे.
– अजय कांबळे, स्थानिक रहिवासी

लोकांच्या तक्रारी आल्या की आम्ही लगेच कारवाई करतो.या भागात कायम आमची गस्त असते यादरम्यान असं काही दिसल्यास आम्ही लगेच त्यावर कारवाई करतो. बर्‍याच जणांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली आहे आणि यामध्ये सातत्य असते.
-पंडित थोरात,व.पो.नि., ना.जोशी मार्ग पोलीस ठाणे,लोअर परळ.

First Published on: November 17, 2018 6:02 AM
Exit mobile version