रेल्वे भरतीसाठी स्थानिक कोकणवासीयांचे उपोषण आंदोलन

रेल्वे भरतीसाठी स्थानिक कोकणवासीयांचे उपोषण आंदोलन

प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीला कोकण रेल्वेत नोकरी देऊ असे तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री मधू दंडवते यांनी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना आश्वासन देऊनही ते पूर्ण न झाल्याने सोमवारी विविध जिल्ह्यातील शेकडो प्रकल्पग्रस्तांनी सीबीडी-बेलापूरमधील कोकण रेल्वे कार्यालयावर धडक देत आमरण उपोषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी सन २००० पासून नोटिफिकेशनप्रमाणे परीक्षा दिलेल्या तसेच सर्व चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झालेल्या कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त उमेदवारांना कोकण रेल्वेत नोकरीत घेत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले.या आंदोलनात महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

सन २०१८ मधील ९ मे रोजीच्या बैठकीदरम्यान कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक यांच्या सूचनेनुसार कृती समितीतील नोंदीत २०१ उमेदवारांची यादी अधिसूचनानिहाय दिलेल्या परीक्षेच्या तपशिलासह सादर करण्यात आली होती. ते उमेदवार सर्व चाचण्या उत्तीर्ण होऊनही त्यांना नोकरीत सामावून घेण्यात आले नाही. बर्‍याच उमेदवारांच्या बाबतीत आपण उमेदवाराने सादर केलेल्या जमिनीच्या गट नंबरवर दुसर्‍या व्यक्तीला नोकरी दिल्याचे सांगण्यात आले आहे. तेव्हा या गट नंबरवर किती जणांना नोकर्‍या दिल्या हे स्पष्ट करावे असे यावेळी कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष एस.पी.चव्हाण यांनी सांगितले. जर का जास्त उमेदवारांना नोकर्‍या दिल्या असतील तर त्या सर्व कर्मचार्‍यांना कामावरून त्वरित कमी करावे व आम्हा अन्यायग्रस्त उमेदवारांना नोकरीत सामावून घ्यावे असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रकल्पग्रस्तांमध्ये शैक्षणिक पात्र उमेदवार असतानाही बाहेरील उमेदवाराकडून अर्ज मागवून कोकण रेल्वे प्रशासनाने स्थानिकांवर अन्याय केला. त्यामुळे ही भरती प्रक्रिया पूर्णपणे रद्द करून पात्र उमेदवारांना सामावून घ्यावे, अशी मागणी कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे सचिव अमोल सावंत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

कोकण रेल्वे प्रकल्पात ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यातील अनेकांना नोकर्‍या देण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वे कार्यालयात अर्ध्याहून जास्त प्रकल्पग्रस्त कर्मचारी आहेत. तरीही अजून नोकरी देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
त्यातून लवकरच तोडगा निघेल.
गिरीश करंदीकर :- प्रशासन अधिकारी,कोकण रेल्वे

First Published on: June 11, 2019 5:24 AM
Exit mobile version