पनवेल, रायगडमध्ये आजपासून 24 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढला

पनवेल, रायगडमध्ये आजपासून 24 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढला

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पनवेल महापालिका क्षेत्र आणि रायगडमध्ये आणखी 10 दिवसांचा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. 24 जुलै मध्यरात्री 12 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. रायगड जिल्हा आणि पनवेलमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे लॉकडाऊन वाढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पनवेल मनपा क्षेत्रात 3 ते 14 जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यात वाढ झाली आहे. शिवाय रायगड जिल्हा प्रशासनाने पुढील 24 जुलैपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन घोषित केला आहे. अनलॉकनंतर जिल्ह्यात काही ठिकाणी नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन पुरेसे केले जात नव्हते. विनाकारण रस्त्यावर फिरणे, गर्दी करणे, मास्क लावण्याबाबत निष्काळजीचे प्रकार झाले होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पनवेल पालिका क्षेत्रातही लॉकडाऊन वाढला असल्याची घोषणा पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केली आहे. पनवेल मनपा क्षेत्रात सोमवारी 146 नवे रुग्ण वाढले. रुग्णांची संख्या 3 हजार 980 झाली असून 2496 रुग्ण बरे झाले आहेत. सद्यस्थितीत 1388 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून 96 जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सोमवारी 233 नवे रुग्ण वाढले असून रुग्णांची एकूण संख्या 9678 झाली आहे.

First Published on: July 14, 2020 6:21 AM
Exit mobile version