Lok Sabha Election 2024 : उमेदवारी नाकारल्यानंतर पूनम महाजन यांनी मोदींचे मानले आभार

Lok Sabha Election 2024 : उमेदवारी नाकारल्यानंतर पूनम महाजन यांनी मोदींचे मानले आभार

मुंबई : भाजपाने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करत उत्तर मध्य मुंबई लोकसभेतून महायुतीने ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम यांच्यात लढत होणार आहे. यानंतर आता पूनम महाजन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. (Lok Sabha Election 2024 Poonam Mahajan thanks Narendra Modi after rejecting her candidacy)

पूनम महाजन यांनी ट्वीट करताना म्हटले की, 10 वर्षे खासदार म्हणून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाची सेवा करण्याची संधी प्रदान करण्यासाठी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानते. तसेच केवळ खासदार म्हणूनच नव्हे तर एक मुलगी म्हणून माझ्यावर प्रेम केल्याबद्दल माझ्या मतदारसंघातील कुटुंबियांची मी सदैव ऋणी राहीन आणि हे नाते चिरंतन टिकून राहो, अशी आशा आहे. माझे आराध्य दैवत, माझे वडील दिवंगत प्रमोद महाजन यांनी मला ‘आधी राष्ट्र, मग आम्ही’ हा मार्ग दाखवला. त्याच मार्गावर मी आयुष्यभर चालत राहावे, अशीच प्रार्थना मी ईश्वराकडे करते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सदैव या देशाच्या सेवेसाठी समर्पित असेल, असेही पूनम महाजन यांनी म्हटले.

हेही वाचा – Politics : शशिकांत शिदेंना अटक करण्याचा प्रयत्न केल्यास…; शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले

पूनम महाजनांचा पत्ता कट

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा सुरू होती. भाजपाकडून त्यांना उत्तर मध्य मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात येणार, असेही सांगण्यात येत होते. यासंदर्भात पक्षाकडून चाचपणी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता भाजपाने मोठी खेळी खेळत एक मोठा आणि प्रतिष्ठित चेहरा उमेदवार म्हणून घोषित केला आहे. मात्र उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे भाजपाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांता पत्ता कट झाला आहे. पूनम महाजन यांनी उत्तर मध्य मुंबई लोकसभेचे तब्बल 10 वर्ष खासदार पद भूषविले आहे. पण मागील पाच वर्षांमध्ये त्यांनी आपल्या मतदारसंघात फारसे काम न केल्याने आणि मतदारांसोबत संपर्कही न ठेवल्याने त्यांच्याबद्दल नाराजी दिसून येत होती. काही महिन्यांपूर्वी भाजपाने केलेल्या सर्वेक्षणातही मतदारसंघात त्यांच्याविषयी नाराजी दिसून आली. त्यामुळे पक्षाने पूनम महाजन यांचा पत्ता कट करत नव्या उमेदवाराला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – Ujjwal Nikam : उमेदवारी जाहीर होताच उज्ज्वल निकम म्हणतात, राजकारण करणार नाही

Edited By – Rohit Patil

First Published on: April 27, 2024 10:22 PM
Exit mobile version