Lok Sabha : …म्हणून धार्मिकतेच्या आधारावर मतदारांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

Lok Sabha : …म्हणून धार्मिकतेच्या आधारावर मतदारांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

मुंबई : इंडि आघाडीअंतर्गत सर्व विरोधक एकत्रितपणे निवडणूक लढवत असल्याने विरोधकांच्या मतांची विभागणी होणार नाही, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. भाजपाचा पराभव जवळ आला आहे, हे लक्षात आल्याने पंतप्रधान मोदी धार्मिकतेच्या आधारावर मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

निवडणूक लोकांशी निगडीत मुद्द्यांवर लढल्या जाव्यात, यासाठी आम्ही सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी गुजरातमधील सुरत येथे सांगितले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी कशी असेल, असे विचारले असता ते म्हणाले की, ‘इंडि आघाडीमुळे भाजपविरोधी मतांचे विभाजन यावेळी होणार नाही.’ तर, इंडियाच्या निवडणूक जिंकण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता, पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेसने सत्तेत आल्यानंतर दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. कर्नाटक आणि तेलंगणामध्येही त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत.

लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या आश्वासनांना ‘जुमला’ म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी, अनेक जाणकारांशी सल्लामसलत करून काँग्रेसचा जाहीरनामा तयार करण्यात आल्याचा दावा केला. अनेक अभ्यासू लोकांशी चर्चा करूनच आम्ही आमचा जाहीरनामा तयार केला आहे. तो पंतप्रधान मोदी यांचा जुमला नाही. सत्तेत आल्यावर 100 दिवसांत काळा पैसा परत आणू असे पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी सांगितले होते. त्या आश्वासनाचे काय झाले? तो आता काही लोकांना वाचवायचा प्रयत्न करत आहेत की त्यांच्याशी तडजोड करत आहेत? असे सवाल त्यांनी केले.

भाजपाची मूळ ताकद सुमारे 30 टक्के (व्होट शेअर) आहे, कारण पूर्वी 60 ते 70 टक्के लोकांनी भाजपाच्या विरोधात मतदान केले होते. इंडि आघाडीमुळे आता मतविभाजन होणार नाही. परिणामी भाजपाचा पराभव जवळ आला आहे, हे लक्षात आल्याने पंतप्रधान मोदी धार्मिकतेच्या आधारावर मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. (काँग्रेसच्या काळात) हनुमान चालीसा म्हणण्यास कधी बंदी होती, हे मोदी सांगू शकतात का? ते आता दिशाहीन झाले असून निरर्थक बोलत आहेत. निवडणुकीत भाजपाचा पराभव होत असल्याची जाणीव त्यांना झाली असल्याने ते आता धार्मिक धृवीकरणाचा प्रयत्न करत आहेत. तुमचे मंगळसूत्र हिसकावून घेणार, असे ते जेव्हा म्हणतात, तेव्हा शरमेने माझी मान खाली जाते. अशा टिप्पण्या त्यांना शोभत नाहीत, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : शिवसेनेच्या प्रचार गीताचा आयोगाकडून पुनर्विचार; ठाकरे गटाला दिलासा मिळणार?


Edited by Manoj S. Joshi

First Published on: April 24, 2024 8:39 PM
Exit mobile version