Lok Sabha 2024 : निमित्त जाहिरातीचे आणि सुरू झाले सुषमा अंधारे अन् चित्रा वाघांचे ट्विटर वॉर

Lok Sabha 2024 : निमित्त जाहिरातीचे आणि सुरू झाले सुषमा अंधारे अन् चित्रा वाघांचे ट्विटर वॉर

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे बाकी आहेत. त्यामुळे प्रचाराचा ज्वर चढू लागला आहे. त्यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचार जाहिरातीची भर पडली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत या जाहिरातीवर टीका करताना, यातील एक कलाकार पॉर्नस्टार असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि चित्रा वाघ यांच्या ट्विटर वॉर रंगले आहे.

ठाकरे गटाने मोदी सरकारच्या कारभारावर टीका करताना महिला अत्याचारासंदर्भात एक जाहिरात जारी केली आहे. मात्र, या जाहिरातीमधील कलाकार हा पॉर्नस्टार असून लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चित्रीकरण करणारी ही व्यक्ती या जाहिरातीमध्ये विचारते की, महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार? अशा माणसाला घेऊन ठाकरे गटाने महिला अत्याचारावरची जाहिरात कशी केली? या जाहिरातीमधील कलाकारामुळे महाराष्ट्रातील महिलांची मान शरमेने झुकली आहे. त्यामुळे याचा तपास झाला पाहिजे, अशी मागमी चित्रा वाघ यांनी केली आहे.

याला सुषमा अंधारे यांनी ट्विटरवरून उत्तर दिले आहे. आक्रस्ताळ्याबाई (चित्रा वाघ) सवयीप्रमाणे बडबडून गेल्या. पण 3000हून जास्त सेक्स व्हिडीओ व्हायरल झालेल्या प्रज्वल रेवना किंवा मुलुंडचे एचडी व्हिडिओवाल्याबद्दल (ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या) त्या अळीमिळी गुपचिळी करून बसल्या आहेत. त्यांची काही चूक नाही, सध्या त्या दिल्या भाकरीच्या आणि सांगितल्या चाकरीच्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

तर, चित्रा वाघ यांनीही ट्विटरवरूनच त्याला प्रत्युत्तर दिले आहे. फडफडणारी मशाल विझण्याआधी आपला बुडाखालचा अंधार पाहिला तर अधिक बरे. उपदेशाच्या उचापती करण्यापेक्षा साधे उत्तर का देत नाही? तो पॉर्नस्टार आहे की नाही, या एका प्रश्नाचे उत्तर तेवढे द्या, असे त्यांनी सुनावले आहे. कर्नाटकात त्यांचेच (काँग्रेस) सरकार आहे, ज्यांच्या मांडीवर ठाकरे गट बसला आहे, त्यांना प्रज्वल रेवना यांच्याबाबत सांगावे. कारवाई करण्यापासून कुणी थांबवले आहे? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.


Edited by Manoj S. Joshi

First Published on: May 2, 2024 5:25 PM
Exit mobile version