‘कोणाचं काय ठरलंय’ यावर भिवंडीचं गणित अवलंबून

भिवंडी

भिवंडी लोकसभा मतदार संघामध्ये निवडणुकीच्या मैदानात एकूण 15 उमेदवार उभे आहेत. मात्र त्यामध्ये खरी लढत महायुतीतील भाजपचे उमेदवार खासदार कपिल पाटील आणि आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार माजी खासदार सुरेश टावरे यांच्यामध्ये होणार असून या दोन्ही पक्षांना बंडाळीचा फटका बसणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे .

महायुतीतील भाजपचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांच्या उमेदवारीला शिवसेनेचे उपसंपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा ) यांनी विरोध करीत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे शिवसैनिकांनी बंडाचे निशाण हाती घेऊन तीव्र विरोध केला. त्यामुळे कपिल पाटील चांगलेच अडचणीत आले होते. त्यामुळे महायुतीला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली. दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदार संघात शिवसेना नेते पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचे काम न करण्याची भूमिका काही भाजप नेत्यांनी घेतली. एकनाथ शिंदे यांचे पुत्रप्रेम अडचणीत आल्याने महायुतीला वाचवण्यासाठी सुरेश म्हात्रे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे म्हात्रे यांनी वरिष्ठांसाठी आपली उमेदवारी मागे घेतली. मात्र आपला विरोध भाजप उमेदवार कपिल पाटील यांना कायम असल्याची भूमिका घेतली आहे.

त्यांनी भाजप उमेदवाराचा डोंगर पोखरण्यास सुरुवात करून काँग्रेसला मदत करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना सुरेश म्हात्रे यांचा धोका कायम आहे .तर आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार माजी खासदार सुरेश टावरे यांची उमेदवारी जाहीर होताच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य , कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील हे बंड पुकारून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपच्या कळपात सामील झाले. तसेच ते आता भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारात उतरले आहेत. त्यामुळे कुणबी सेनेचा पाठिंबा काँग्रेसला मिळाला नसल्याने सुरेश टावरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाने सपा, बसपला विचारात न घेतल्याने मुस्लीम मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. तसेच वंचित आघाडीचा उमेदवारसुद्धा महत्वाची भुमिका बजावणार आहे.

कोल्हापूरचे “आपलं ठरलंय ” हे लोण आता भिवंडीत

भिवंडी लोकसभा मतदार संघात नाराज शिवसैनिक सध्या “आपलं ठरलंय ” असे मेसेज सोशल मीडियावर फिरवत असल्याने आता कोल्हापूर येथील “आपलं ठरलंय ” नावाचे बंड समोर येत आहे. तसेच शिवसेनेचे बंडखोर सुरेश म्हात्रे मैदानात उतरून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे नाराज शिवसैनिक आता त्यांच्या भूमिकेची वाट पाहत असून भाजप गटात चांगलीच खळबळ माजली आहे .

First Published on: April 21, 2019 4:34 AM
Exit mobile version