आजी माजी खासदारांमध्ये चुरशीची लढत

आजी माजी खासदारांमध्ये चुरशीची लढत

दक्षिण मध्य मतदारसंघात उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी लढलेल्या नाना प्रकारच्या शकला पाहता यंदाची लोकसभा निवडणूक अतिशय चुरशीची ठरणार आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी सर्वतोपरी केलेले प्रयत्न पाहता विजयाचे समीकरण आता तितकस सोपे राहिलेले नाही.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या हाताला सोबत देण्यासाठीचा श्रीगणेशा दक्षिण मध्य मतदारसंघातच केला. त्यानंतर संपूर्ण राज्यात राज ठाकरे यांनी दहा सभा घेऊन युतीविरोधातील भूमिका मांडली.

कार्यकर्त्यांनी भाजपविरोधी प्रचार करावा या भूमिकेत कालांतराने शिवसेनेची भर पडली. हाच फॅक्टर काँग्रेसचे उमेदवार असलेले एकनाथ गायकवाड यांच्या पथ्यावर पडेल असे संकेत आहेत. मनसेच्या उमेदवाराला याआधीच्या निवडणुकीत चांगले मतदान झाले होते. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भूमिकेला मतदार किती साथ देतात हे निर्णायक ठरेल. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी मतदारसंघात विविध समाजाचा पाठिंबा मिळवला आहे. तसेच पक्षातील दिग्गज नेत्यांची फौजही आपल्या मतदारसंघात उत्तम प्रकारे सभा घेण्यासाठी वापरली आहे. शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी निर्मला सीतारमण यांच्यासह रामदास आठवले यासारख्या बड्या नेत्यांना सभा घेण्यासाठी आणले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचाही मतदारसंघात रोडशो मोठ्या धडाक्यात झाला. तर एकनाथ गायकवाड यांनीही पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक स्टार प्रचारक बोलावले.

जनसंवाद यात्रा, माटुंगा फाईव्ह गार्डनमध्ये मॉर्निंग वॉक, रपर्सचा रपपासून ते आदेश भाऊजींचा प्रचारासाठी वापर अशा अनेक प्रकारे मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न राहुल शेवाळे यांनी केला आहे. तर एकनाथ गायकवाड यांनीही प्रचारासाठी अनेक शकला लढवल्या आहेत. प्रचारफेर्‍यांमध्ये कटआऊट्सचा वापर करत ते अनेक ठिकाणी मतदारसंघात पोहचले. भौगोलिकदृष्ट्या मोठ्या मतदारसंघात दोन्ही उमेदवारांची परीक्षा ही मतदारसंघात पोहचण्याच्या निमित्ताने झाली खरी, पण आता मतदार कोणाला कौल देणार हे येत्या २३ मे रोजी ठरेल. मतदारसंघात यंदा आपचा उमेदवार नाही आणि मनसेचाही नाही. तर गेल्या निवडणुकीत नोटाच्या माध्यमातून झालेले मतदान यावेळी वाढणार की कोणत्या उमेदवाराचे पारडे ही मत जड करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. एकीकडे मुस्लीम आणि दलित बहुल असलेला मतदारसंघ तसेच मध्यम उच्च वर्गीयांचा दुसरा दादर, माटुंग्याचा परिसर अशी संमिश्र आर्थिक स्थरातील मतदारांची ओळख असलेल्या मतदारसंघात यंदा कुणाला कौल मिळणार हे मतदानाच्या आकडेवारीतून लवकरच स्पष्ट होईल.

मोदी लाट यंदा नसली तरीही शिवसेनेने या मतदारसंघात विद्यमान खासदारालाच तिकीट देत ताकद लावली आहे. तर काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्यावर काँग्रेसनेही विश्वास दाखवला आहे. एकही खासदार दुसर्‍यांदा निवडून आलेला नाही असा या मतदारसंघाचा इतिहास आहे. पण यंदाच्या लोकसभेसाठी उमेदवारी मिळालेले उमेदवारांनी एकदा खासदारकीची टर्म पूर्ण केली आहे. त्यामुळे राहुल शेवाळेंची दावेदारी कायम राहणार की एकनाथ गायकवाड यांना पुन्हा संधी मिळणार अशी ही चुरशीची लढत यंदाच्या लोकसभेच्या निमित्ताने पहायला मिळेल.

First Published on: April 28, 2019 4:10 AM
Exit mobile version