एमएड, बीपीएड, एमपीएड प्रवेशासाठी जादा फेरी

एमएड, बीपीएड, एमपीएड प्रवेशासाठी जादा फेरी

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी) राबविण्यात येत असलेल्या बीपीएड, एमपीएड आणि एमएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून अनेक विद्यार्थी अद्यापही वंचित आहेत. तसेच काही कॉलेजांमध्ये जागा रिक्त आहेत. त्यातच विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फेरी राबवण्याची विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने 25 ते 29 नोव्हेंबरदरम्यान जादा फेरी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील नोटीस आणि प्रवेशाचे वेळापत्रक सीईटी सेलच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

बीपीएड,एमपीएड आणि एमएड प्रवेश प्रक्रियेचा कालावधी 24 जून ते 10 ऑक्टोंबरपर्यंत होता. प्रवेश फेर्‍यानंतरही बीपीएडच्या 4 हजार 850 जागांपैकी 1 हजार 689, एमपीएडच्या 905 पैकी 141 आणि एमएडच्या 2 हजार 995 जागांपैकी 2 हजार 30 जागा रिक्त राहिल्या आहेत. बीपीएड आणि एमएडच्या जागा मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिल्या आहेत. तर अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतलेले नाहीत. त्यामुळे रिक्त जागांवर प्रवेश देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. विद्यार्थ्यांच्या मागणीचा व रिक्त जागांचा विचार करून बीपीएड,एमपीएड आणि एमएड या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जादा फेरी राबवण्याचा निर्णय सीईटी सेलचे आयुक्त संदीप कदम यांनी घेतला आहे. त्यानुसार 25 ते 29 नोव्हेंबरदरम्यान ही फेरी घेण्यात येणार आहे. त्यानुसार 26 नोव्हेंबरला कॉलेजांकडून त्यांचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. तर 27 तारखेला कॉलेजांकडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येइल. त्यानंतर 29 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल.

विधी अभ्यासक्रमाची आणखी एक प्रवेश फेरी
विधी तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या हजारो जागा रिक्त आहेत. या जागांवर प्रवेश देण्यासाठी सीईटी सेलमार्फत आणखी एक प्रवेश फेरी राबविण्यात येणार आहे. सीईटी सेलचे आयुक्त संदीप कदम यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या फेरीचे वेळापत्रक 26 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.

First Published on: November 26, 2019 1:44 AM
Exit mobile version