पटकथाकार मधुसूदन कालेलकर

पटकथाकार मधुसूदन कालेलकर

मधुसूदन कालेलकर हे मराठी नाटककार, कथाकार, कवी, गीतकार आणि पटकथाकार होते. त्यांचा जन्म २२ मार्च १९२४ रोजी वेंगुर्ले येथे झाला. शालेय शिक्षण वेंगुर्ल्यात झाल्यावर ते मुंबईत आले. सुरुवातीस ते गिरगावात राहण्यास आले. तिथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी त्यांचे पहिले नाटक लिहिले आणि आपल्या लिखाणाचा श्रीगणेशा केला.

कालेलकरांनी एकूण २९ नाटके आणि मराठी व हिंदी मिळून १११ चित्रपटांसाठी लिखाण केले. त्यात त्यांनी कौटुंबिक, गंभीर, विनोदी, सामाजिक असे अनेक विषय हाताळले आहेत. त्यांचे काही प्रमुख हिंदी चित्रपट ‘बात एक रात की,’ ‘ब्लफ मास्टर,’ ‘झुमरू,’ ‘फरार,’ ‘दुल्हन वही जो पिया मन भाये,’ ‘अखियों के झरोखों से,’ ‘गीत गाता चल,’ इत्यादी होते. त्यांनी चार नाटकांची निर्मिती केली. अनेक नाटकांचे गुजराती भाषेत प्रयोग झाले, तर तीन ते चार नाटकांवर हिंदी व मराठीत चित्रपटही झाले आहेत.

‘आम्ही जातो आमुच्या गावा’, ‘पाहू रे किती वाट’, ‘अपराध’, ‘जावई विकत घेणे आहे’ , ‘अनोळखी’, ‘गुपचूप गुपचूप’, हे त्यांचे चित्रपट आहेत. तसेच ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ या चित्रपटातील निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, या आजतागायत अंगाई म्हणून घरांघरांत सुपरिचित असलेल्या गीतासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गीत लेखनाचे पारितोषिक देण्यात आले.

त्यांच्या ‘अपराध मीच केला,’ ‘सागरा प्राण तळमळला’ व ‘शिकार’ या नाटकांना महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ट साहित्यिक कलाकृतीचे पारितोषिक मिळाले. ‘हा माझा मार्ग एकला’, या त्यांनी लिहिलेल्या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात त्यांना एकूण नऊ वेळा सर्वोत्तम कथा, पटकथा व संवाद यांसाठी पुरस्कार मिळाला आहे. या व्यतिरिक्त त्यांना तीन वेळा रसरंग फाळके गौरवचिन्ह पुरस्कार देण्यात आला आहे. अशा या प्रतिभाशाली लेखकाचे १७ डिसेंबर १९८५ रोजी निधन झाले.

First Published on: March 22, 2022 3:00 AM
Exit mobile version