महा करिअर पोर्टलला सरल आयडीचा खो

महा करिअर पोर्टलला सरल आयडीचा खो

करिअर निवडीसाठी व शैक्षणिक माहितीसाठी शालेय शिक्षण विभागाने सुरु केलेल्या ’महा करिअर पोर्टल’वर जाण्यासाठी विद्यार्थ्यांकडे सरल आयडी क्रमांक असणे आवश्यक आहे. मात्र शाळा बंद, शिक्षक संपर्कात नाहीत, असे असताना सरल आयडी आणायचा कुठून, असा प्रश्न राज्यातील विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.

राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग, युनिसेफ,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदेच्या एकत्रित सहकार्याने राज्यातील ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘महा करिअर पोर्टल’ २७ मे पासून सुरु होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यार्थी सरल आयडी वापरून २७ मेपासून पोर्टलवर लॉगिन करता येणार आहे. मात्र हा सरल आयडी विद्यार्थ्यांना शाळेतूनच घ्यावा लागणार आहे. मात्र दोन महिन्यांपासून करोनामुळे शाळा पूर्णतः बंद आहेत. अनेक शाळा आता क्वारंटटाईन सेंटर झाल्या आहेत, असे असताना आयडीसाठी मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांच्याशी विद्यार्थ्यांना संपर्क करणे कठीण आहे. त्यामुळे या पोर्टलचा फायदा विद्यार्थ्यांना कितपत होणार हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

www.mahacareerportal.com या पोर्टलवर राज्यातील ९ वी ते १२ वीच्या ६६ लाख विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे ५५६ अभ्यासक्रम व २१००० व्यावसायिक संस्था आणि महाविद्यालयांची माहिती देण्यात आली आहे. तसेच अभ्यासक्रमांचा कालावधी, शुल्क, प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, उपलब्ध संधी आदी माहिती या पोर्टलवर देण्यात आल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून सष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांना सरल आयडी मिळविण्यासाठी शाळेशी संपर्क साधायला सांगितले आहे. पण सध्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत. मुंबई रेडझोनमध्ये आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना शाळेशी संपर्क साधण्यास सांगणे चुकीचे आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यावर विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात.
– अनिल बोरनारे, संयोजक, भाजप शिक्षक आघाडी.

First Published on: May 26, 2020 4:22 AM
Exit mobile version