‘माझा आमदार, माझा मुख्यमंत्री’; मातोश्रीच्या अंगणात पोस्टरबाजी!

‘माझा आमदार, माझा मुख्यमंत्री’; मातोश्रीच्या अंगणात पोस्टरबाजी!

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा काही सुटत नाही आहे. जनमताचा कौल महायुतीला असल्याने त्यांनीच सत्ता स्थापन करावी, असे विरोधकांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. पण असे असले तरी महायुतीतील दोन प्रमुख पक्ष असलेले भाजप आणि शिवसेनेत मात्र मुख्यमंत्री आणि महत्त्वाच्या खातेवाटपावरून रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे. अशा वातावरणात मातोश्रीच्या अंगणात आज ‘माझा आमदार, माझा मुख्यमंत्री’ असे पोस्टर झळकताना दिसत आहे. हे पोस्टर शिवसेनेचा नगरसेवक हाजी हलीम खान यांनी लावल्याचे बोलण्यात येते.

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटणार?

दरम्यान कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लवकरच सत्ता स्थापन होणार, असे सांगितले. दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील काल राज्यपालांची भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमातील प्रतिनिधींशी बोलताना सत्ता स्थापनेला उशीर होण्यास शिवसेना जबाबदार नसल्याचे म्हटले होते. दरम्यान, आम्हाला जनमताने विरोधात बसण्याचा कौल दिला तेव्हा आम्ही विरोधातच बसू असे सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेतेसुद्धा एकमेकांच्या गाठीभेटी घेत आहेत. कालच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना शरद पवार यांनी पुन्हा आम्ही विरोधातच बसणार असे सांगितले. पण त्याचवेळी भाजप-शिवसेनेने लवकरच सत्तास्थापनेचा पेच सोडवावा असेही म्हटले. एवढेच नाही तर भाजप-शिवसेनेच्या वादात सत्तास्थापन न झाल्यास भविष्यातील पर्यायसुद्धा खुले असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. याचसाठी शरद पवार पुन्हा एकदा सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

First Published on: November 5, 2019 8:46 AM
Exit mobile version