Maharashtra Budget Session 2022 : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख हुकली, मविआसमोर नवा पेच

Maharashtra Budget Session 2022 : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख हुकली, मविआसमोर नवा पेच

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई :  विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ९ मार्च रोजी विधानसभाअध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात यावी, असा प्रस्ताव आघाडी सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिला होता. मात्र, राज्यपालांनी निवडणूक घेण्यास मंगळवारी रात्रीपर्यंत मान्यता दिली नव्हती. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची आज, बुधवारची तारीख सुद्धा हुकल्यात जमा आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी राजभवन येथे जाऊन राज्‍यपालांची भेट घेतली. या भेटीत त्यांना विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला मान्यता देण्याची विनंती करण्यात आली.

आज राज्यपालांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून पुढील आठवड्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल, असे बाळासाहेब थोरात यांनी या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

राज्‍याचा अर्थसंकल्‍प परवा, शुक्रवारी सादर होईल.त्‍याआधी ९ मार्च रोजी विधानसभाध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्‍न होता.मात्र आता ९ मार्च रोजी ही निवडणूक होणार नाही हे स्‍पष्‍ट झाले आहे.आता १४ किंवा १५ मार्च रोजी तरी ही निवडणूक घेण्याचा सरकारचा प्रयत्‍न राहिल.


हेही वाचा – मुंबईत दुसऱ्या टप्प्यात ६ हजार CCTV बसवणार, गृहमंत्र्यांची माहिती

First Published on: March 8, 2022 10:10 PM
Exit mobile version