जुमलेबाजीचा अंत केवळ काही महिने दूर – अशोक चव्हाण

जुमलेबाजीचा अंत केवळ काही महिने दूर – अशोक चव्हाण

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर टीकेची झोड सुरुच आहे. कल्याण मेट्रो प्रकल्पाच्या भूमीपूजनासाठी आलेल्या मोदींवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जोरदार टीका केली आहे. शिर्डीमध्ये साईबाबांच्या समोर येऊन देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलले होते. तीच परंपरा कल्याण येथे देखील खोटे बोलून पंतप्रधानांनी सुरू ठेवली असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. गेले चार वर्ष जुमलेबाजी आणि अतिरंजित आकडे दर्शवून खोट्या विकासाच्या वल्गना करणे यापेक्षा अधिक मोदी तसेच राज्यातील फडणवीस सरकारने काहीही केलेले नाही. धादांत खोटं बोलून अवास्तव घोषणांचा पाऊस पाडायचा ही कार्यपद्धती पंतप्रधानांनी कल्याण येथील भूमीपूजनाच्या कार्यक्रमात ही सुरू ठेवली आहे. निवडणूका केवळ काही महिनेच दूर असल्याने या जुमलेबाजीचा अंत जवळ आला असून नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकांमध्ये तेथील जनतेने भाजपच्या जुमलेबाजीचा जसा अंत केला तसाच अंत महाराष्ट्राची जनता करेल, असा ठाम विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.


मुंबईचा अजून विस्तार होणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी


जनतेची फसवणुक सुरू

अशोक चव्हाण यांनी असे म्हटले आहे की, सिडको महागृहनिर्माण योजना २०१८ अंतर्गत जवळपास ८९,७७१ हजार घरे बांधण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते आज कल्याण येथे करण्यात आले. सदर प्रकल्पानुसार नवी मुंबई येथील विविध रेल्वे स्थानकांच्याजवळ घरे बांधण्यात येणार आहेत. नवी मुंबईमध्ये बांधण्यात येणाऱ्या घरांचे भूमिपूजन कल्याण येथे कसे करण्यात येते याचे उत्तर पंतप्रधानांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यावे. तसेच या गृहनिर्माण प्रकल्पाचे टेंडरही निघाले नाही. हा प्रकल्प इतर प्रस्तावित प्रकल्पांकरीता राखीव जागांवर करण्यात येणार असल्याने जमिनीच्या वापरातही बदल करणे अभिप्रेत आहे. त्यामुळे निवडणुकांपर्यंत ही सगळी प्रक्रिया पार पडणे शक्य नाही. म्हणूनच भूमीपूजनाचे नाटक करून जनतेला फसविले जात असल्याची टीका त्यांनी केली आहे.

टेंडर निघाले नसताना भूमिपूजन

मेट्रो ५ च्या अन्वये ठाणे ते भिवंडी अशा मेट्रो प्रकल्पाचे आज पंतप्रधानांनी भूमिपूजन केले. सदर प्रकल्पाकरीता जमिनीचे एक इंचही अधिग्रहण झालेले नाही, पर्यावरण व वन विभागाची परवानगी देखील मिळलेली नाही, या मेट्रोचा मार्गही ठरलेला नाही, तसेच टेंडरही निघालेलं नाही. असे असतानाही निवडणूका समोर ठेऊन भूमिपूजन करण्याचा हा सरकारचा प्रयत्न हास्यास्पद असल्याची टीका अशोक चव्हाण यांनाी केली आहे.

शिवस्मारकाची एकही वीट लागलेली नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक याचे भूमिपूजन होऊन जवळपास ३ वर्षे होऊनही कामाची एकही वीट लागलेली नाही. बिहार तसेच मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये या भूमिपूजनाचा राजकीय उपयोग करून घेण्यात आला. बुलेट ट्रेनच्या भूमीपूजनाला देखील वर्ष होऊन गेलेलं आहे. परंतु जमीन अधिग्रहण तसेच मार्ग हे दोन्ही विषय अजूनही अडकलेले आहेत. तसेच उच्च न्यायालयाला त्याची दखल घ्यावी लागत आहे याची आठवण देखील चव्हाण यांनी करून दिली.

साईबाबांसमोर मोदी खोटे बोलेले

साईबाबांच्या समोर खोटे बोलून पंतप्रधानांनी खोटे बोलण्याच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. शिर्डी येथे १६ हजार गावे दुष्काळमुक्त केली असे धादांत खोटे वक्तव्य पंतप्रधानांनी केले. त्यानंतर केवळ ८ दिवसांत ही सर्व गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या यादीत दिसली आहेत. काँग्रेस प्रणित यूपीए सरकारच्या कार्यकाळात २५ लाख घरे बांधण्यात आली त्याच्या तुलनेत मोदी सरकारच्या चार वर्षाच्या कालावधीत १ कोटी १५ लाख घरे बांधण्यात आली असे सपशेल खोटे वक्तव्य पंतप्रधानांनी केले असल्याची टीका त्यांनी केली आहे.

First Published on: December 18, 2018 10:24 PM
Exit mobile version