फडणवीसांना खोटं बोलण्याची दिक्षा मोदींनी दिली – सचिन सावंत

फडणवीसांना खोटं बोलण्याची दिक्षा मोदींनी दिली – सचिन सावंत

मंत्र्यांच्या सरकारी बंगल्यावर चालते लाचखोरी!

काँग्रेसला इंदू मिलची जागा बळकवायची होती असा जावईशोध राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे. खोटं बोलण्यामध्ये त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही कारण साक्षात मोदींकडून त्यांना ही दिक्षा मिळालेली आहे. बेताल वक्तव्ये, अप्रचार, खोटे बोलणे हा भाजपच्या निवडणूक रणनितीचा भाग आहे. आता निवडणुका आल्याचं आहेत तेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते अशी वक्तव्ये सुद्धा त्यांच्याकडून ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

काय म्हणाले सावंत

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की,”ही खोटे बोलण्याची प्रक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेतून आली आहे. संघाचे लोक खोटे बोलतात अप्रचार, बदनामी करतात यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघाला विरोध होता. काँग्रेस पक्षाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाबत काय केलं हे मुख्यमंत्र्यांनी सांगायची आवश्यकता नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक इंदू मिलमध्ये करू हे काँग्रेसच्या निवडणूक जाहिरनाम्यामध्ये सांगितले होते.. प्रिन्सिपल अप्रूवल आणण्याचं कामसुद्धा आम्ही केलं, भाजपला प्रमाणे फक्त निवडणुकीसाठी स्मारकाचा वापर आम्ही केला नाही. २०१५ साली बिहार निवडणुकीआधी, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी भूमीपूजन केले पण अजूनही एकसुद्धा वीट रचली गेली नाही. भाजपला बाबासाहेब आंबेडकराच्यां स्मारकाचा उपयोग फक्त राममंदीरासारखा, ‘मंदीर वहीं बनायेंगें’ असा निवडणुकीपुरता करायचा आहे का? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे.”

काँग्रेसची बदनामी होणार नाही

मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसची बदनामी करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी ते होणार नाही. कारण काँग्रेसला आता सगळ्या दलित, मागसवर्गीय समाजाचा पाठिंबा मिळतोयं, आणि खऱ्या अर्थाने सगळ्या दलित, मागासवर्गीय समाजाला कळून चुकलं आहे की हे सरकार आपलं नाही. त्यांना हे वाटतयं त्यामुळे त्यांच्यातील जनआक्रोश आता वाढत आहे, याची काळजी मुख्यमंत्र्यांनी करावी असे सावंत म्हणाले.

First Published on: January 20, 2019 8:39 PM
Exit mobile version