काँग्रेस बाहेरून पाठिंब्यास तयार, पवारांना मात्र ते सरकारमध्येच हवेत

काँग्रेस बाहेरून पाठिंब्यास तयार, पवारांना मात्र ते सरकारमध्येच हवेत

शरद पवार आणि सोनिया गांधी

महाराष्ट्रातील सत्तेची कोंडी फुटण्याचे २६ दिवसानंतरही चित्र धूसर आहे. ही कोंडी फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोमवारी दिल्लीत गेले खरे, पण महाशिवआघाडीचा पेच काही सुटला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी अद्याप शिवसेनेसोबत सत्तेत येण्यास राजी नाहीत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारला काँग्रेस बाहेरून पाठिंबा देईल, अशी काँग्रेसची भूमिका आजही कायम आहे. मात्र शिवआघाडीच्या या सरकारला भविष्यात कुठलाही धोका नको म्हणून काँग्रेसने कुठल्याही परिस्थितीत आधी सत्तेत सहभागी व्हावे म्हणून पवार आग्रही असल्याची माहिती राष्ट्रवादीमधील सूत्रांनी दिली.

भाजपपासून फारकत घेणार्‍या शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे. स्वतः पवार यांनी आपल्या पक्षाची भूमिका ठरवताना सत्तासूत्र निश्चित केले आहे. महाशिवआघाडीत शिवसेनेचाच मुख्यमंत्री ही मातोश्रीची मागणी मान्य करताना उपमुख्यमंत्रीपद आणि मंत्रिमंडळातील महत्वाची पदे वाटून घेण्याचे त्यांचे सत्ता गणित तयार असताना काँग्रेसचे अजूनही तळ्यात मळ्यात सुरु आहे. सरकारमध्ये सहभागी व्हावे की या सरकारला बाहेरून पाठिंबा द्यावा यावर त्यांचा अंतिम निर्णय होताना दिसत नसल्यामुळे मार्ग काढण्यासाठी पवार सोमवारी दिल्लीत गेले होते. या बैठकीत पवारांनी सोनिया गांधी यांना महाराष्ट्रतल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती दिली. मात्र आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देतो, असे काँग्रेसचे गेल्या काही दिवसांपासूनचे पालुपद त्यांनी यावेळीही आळवले. गेल्या आठवड्यात काँग्रेस नेते आणि सोनिया गांधी यांचे विश्वासू सहकारी अहमद पटेल मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसची हीच भूमिका राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करताना स्पष्ट केली होती. मात्र काँग्रेसची ही भूमिका संदिग्ध वाटत असल्याने पवारांनी सत्ता स्थापनेचा निर्णय घाईगडबडीत न घेण्याचे ठरवले. आपले मत शिवसेनेच्या कानावर टाकले. मातोश्री याला राजी झाल्यानंतर पवार सोनिया गांधी यांच्या भेटीला रवाना झाले, असे सूत्रांनी सांगितले.

आक्रमक हिंदुत्ववादी शिवसेनेसोबत सत्तेत गेल्यास राष्ट्रवादीला काही फरक पडत नसला तरी काँग्रेसला भविष्यात देशभर त्याचे मोठे परिमाण सहन करावे लागतील, अशी भीती काँग्रेस पक्षश्रेष्ठींना अजूनही वाटत आहे. काँग्रेसचा एका मोठा गट शिवसेनेसोबत जाण्यास तयार नाही. त्याऐवजी बाहेरून पाठिंब्याचा मध्यम मार्ग स्वीकारण्यास ते तयार आहेत. आगामी निवडणुकांना सामोरे जाताना त्यांना आपला धर्मनिरपेक्षतेचा चेहरा सोडायचा नाही आणि हीच महाशिवआघाडीची कोंडी ठरली आहे.

सेनेबरोबर काँग्रेसची साधी चर्चा सुद्धा नाही
महाराष्ट्रात भाजपवजा सरकार येण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. या स्थितीत शिवसेनेबरोबर किमान चर्चा करावी, असे काँग्रेसच्या नेत्तृत्वाला अजूनही वाटत नसल्याने निवडून आलेल्या काँग्रेस आमदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. काँग्रेसने वेळकाढूपणा केल्यास त्याचा फायदा घेऊन भाजप गोळाबेरीज करून सरकार स्थापन करेल, अशी भीती या आमदारांना वाटत आहे.

सत्तेतील सहभागाचे संयुक्त पत्र                                                                                        महाशिवआघाडीच्या सत्तेत आम्ही दोन्ही पक्ष सहभागी होणार आहोत. काँग्रेसने आमच्या सोबत एक संयुक्त पत्र काढावे. तसेच सत्तासूत्र कसे असावे, याची कागदोपत्री एकमेकांना माहिती दिली जावी, यासाठी अध्यक्ष शरद पवार प्रयत्नशील आहेत. तसा आग्रह सोनिया गांधी यांच्या भेटीत पवार यांनी धरल्याचे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने सांगितले.

First Published on: November 19, 2019 5:40 AM
Exit mobile version