महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तुत्ववान मराठा स्त्री यावी; शरद पवारांसमोर शेलारांची गुगली

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तुत्ववान मराठा स्त्री यावी; शरद पवारांसमोर शेलारांची गुगली

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एखादी कर्तृत्ववान मराठा स्त्री बसावी, अशी अपेक्षा बाळगणारा मोठा वर्ग समाजात आहे. माझ्यासारख्या माणसाचेही या मागणीला शंभर टक्के समर्थन आहे’ असे वक्तव्य भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच केले. शरद पवारांसमोर हे वक्तव्य करण्याचा नेमका अर्थ काय? आशिष शेलार यांच्यासारखा चाणाक्ष राजकारणी नेमक्या कोणत्या दिशेने अंगुलीनिर्देश करतोय? यावर आज दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. शेलार यांचा रोख राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे होता, हे स्पष्ट होत आहे. शेलार यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या गोटात मात्र अस्वस्थता वाढली असावी.

महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी संपादित केलेल्या ‘कर्तुत्ववान मराठा स्त्रिया’ या पुस्तकाचे प्रकाशन आज शरद पवार आणि आशिष शेलार यांच्याहस्ते झाले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडलेल्या या सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव देखील उपस्थित होते. या पुस्तकात शरद पवार यांच्या मातोश्री शारदाताई पवार यांच्याबद्दलही लिखाण करण्यात आलेले आहे.

शेलारांचे एका बाणात तीन लक्ष्य

पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी आपल्या भाषणात आशिष शेलार यांना भविष्यातील मुख्यमंत्री म्हणून संबोधले होते. त्यामुळे शेलार यांनी आपल्या भाषणाच्यावेळी महाराव यांना उत्तर देत असताना चोरमारे यांच्या पुस्तकाचा संदर्भ घेत मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असे विधान केले. या विधानामुळे शेलार यांनी एका दगडात तीन वेध घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे. सुप्रिया सुळे यांना पुढे करुन राष्ट्रवादीतच मुख्यमंत्रीपदाची मनिषा बाळगणारे अजित पवार यांना छेद दिला आहे. तर स्वपक्षातील देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेला देखील त्यांनी टोला लगावला आहे.

आशिष शेलार हे २०१७ च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे मुंबई अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने स्वबळावर ही निवडणूक लढवत चांगले यश मिळवले होते. मात्र यावेळी होणाऱ्या निवडणुकीपासून शेलार यांना लांब ठेवण्यात आले आहे. त्यांच्या अनुभवाचा वापर पक्षाकडून यावेळी करण्यात आलेला नाही. त्यांच्याऐवजी आमदार अतुल भातखळकर यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे शेलार नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.

First Published on: November 20, 2020 6:48 PM
Exit mobile version