नाणार प्रकल्प समर्थकांच्या पत्रकार परिषदेत स्वाभिमान पक्षाचा राडा

राजापूर येथे होऊ घातलेल्या नाणार रिफायरी प्रकल्पावरून एकीकडे राजकारण रंगले असताना आज नाणार प्रकल्पाला समर्थन देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र, या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोधळ घालत ही पत्रकार परिषद उधळून लावली.

नाणार प्रकल्प बचाव समितीच्या अजय सिंह सेंगर यांच्या वतीने नाणार प्रकल्पाला होणारा विरोध कसा अयोग्य आहे, हे सांगण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, नाणार प्रकल्प बचाव समितीची मुंबईतील पत्रकार परिषद महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावल्यानंतर प्रकल्प विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम स्वाभिमान कार्यकर्त्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले.

माझ्या कार्यकर्त्यांचा मला माज आहे – निलेश राणे

पत्रकार परिषदेत गोंधळ घातल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचा माज असल्याचे ट्विट केले आहे.


‘नाणार प्रकल्प बचाव समितीची पत्रकार परिषद महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावून समर्थन देणाऱ्यांना स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जागा दाखवली. परत असा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर स्वाभिमान पक्ष आणखी पेटून उठेल. मला माझ्या कार्यकर्त्यांचा माज आहे’, अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली. तर नितेश राणे यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांचे समर्थन केले असून, नाणार प्रकल्प हा कोकणाला उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळे आमचा त्याला विरोध असणार आहे आणि जर त्याला समर्थन देणारे प्रकार होणार असतील, तर आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली.

First Published on: April 25, 2018 12:06 PM
Exit mobile version