…तिचा मारेकरी पोलसांसोबतच फिरून त्यांची दिशाभूल करत होता

…तिचा मारेकरी पोलसांसोबतच फिरून त्यांची दिशाभूल करत होता

murder case

मुंबईत शहरात खळबळ उडवून देणाऱ्या ५ वर्षाच्या मुलीच्या मारेकऱ्याच्या शोधासाठी वणवण भटकत असताना हा मारेकरी काही तास पोलिसांसोबत फिरत होता. अखेर त्याच्या संशयित हालचालीवर पोलिसांना संशय येताच पोलिसांनी त्याची उलटतपासणी करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांचे ३० ते ३५ जणांचे पथक ज्या मारेकऱ्याचा शोघ घेत होते, तोच मारेकरी तपास पथकासोबत फिरून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत होता. अखेर पोलिसांनी गुरुवारी रात्री या मारेकऱ्याला अटक करून २४ तासाच्या आत या गुन्ह्याची उकल केली.

अशी घडली घटना

मेहंदी हसन मोहम्मद मुस्ताक शेख (२३) असे अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्यांचे नाव आहे. माहीम दर्गा या ठिकाणी फुटपाथवर राहणारा मेहंदी हा मृत मुलीच्या वडिलांचा मित्र आहे. आई-वडिलांसोबत फुटपाथवर झोपलेली एक पाच वर्षांची मुलगी गुरुवारी पहाटेच्या सुमारास बेपत्ता झाली होती. वेटबिगारी करणार्‍या मृत मुलीच्या आईवडिलांनी तिचा शोध घेतला. मात्र, ती भेटत नसल्यामुळे अखेर या दाम्पत्यांनी माहीम पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. माहीम पोलिसांनी अज्ञात इसमावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरु केला. दरम्यान, माहीम येथील हॉली क्रॉस रोडवरील डेथ बेनीकोट सोसायटीच्या मागील बाजूस पार्किंगच्या जागी एका मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला. सदर मृत्यूदेह हा बेपत्ता झालेल्या मुलीचाच असल्याचे उघड झाले.

आरोपी सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद

पीडित मुलीवर अत्याचार करुन तिची गळा आवळून हत्या करण्यात आले असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. ५ वर्षाच्या मारेकऱ्यांच्या शोधासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी या गुन्ह्याचा तपासासाठी तब्बल १० पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचे विविध पथके तयार करून तपासकामी लावले होते. दरम्यान, पोलिसाना घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या एका फर्निचरच्या दुकानाबाहेर असलेल्या सीसीटीव्हीचे फुटजमध्ये मारेकरी मुलीला घेऊन जात असल्याचे दिसले. मात्र आरोपीचा पाठमोरा भाग दिसून येत असल्यामुळे मारेकऱ्याला ओळखणे अवघड झाले होते.

पोलिसांची दिशाभूल करत होता

माहीम पोलीस ठाण्याचे एक पथक मारेकऱ्यांचा शोध घेत असल्याचे मेहंदीच्या लक्षात येताच त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तो पोलिसांच्या मदतीसाठी पुढे आला. पोलीस पथक परिसरातील आणखी सीसीटीव्ही फूटेज शोधत असताना मेहंदी त्यांच्या पुढेपुढे करत. पोलिसांना मदत करीत असल्यामुळे पोलिसांना त्याच्यावर जराही संशय आला नाही. काही तास पोलिसासोबत फिरल्यानंतर तपास पथकाने मारेकऱ्यांचे पाठमोरे असलेले फुटेज देखील मेहंदीला दाखवले असता तो घाबरला आणि तेथून निघून जाण्यासाठी त्याने पोलिसांना हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र तपास पथकाने त्याला जाऊ दिले नाही. अखेर त्याच परिसरात काही महिलांनी फुटेज ओळखले आणि हा तर मेहंदी हसन मोहम्मद मुस्ताक शेख याच्यासारखा दिसत असल्याचे काही महिंलांनी पोलिसांना सांगितले. आपल्या सोबत सकाळपासून असलेल्या मेंहदीच मारेकरी असल्याचे कळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची उलट तपासणी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

मुलीवर होती वाईट नजर

आरोपी मेहंदी हसन मोहम्मद मुस्ताक शेख २३ वर्षांचा आहे. हत्या केलेली मुलगी ज्या ठिकाणी रहायची त्याच ठिकाणी आपल्या तीन मुली आणि पत्नीसोबत रहातो. त्याची अनेक दिवसांपासून त्या मुलीवर वाईट नजर होती. गुरुवारी भल्या पहाटे मेहंदी त्या मुलीला घेऊन पळून गेला. त्यानंतर डेथ बेनीकोट सोसायटीच्या मागे त्या मुलीवर अत्याचार करून त्याने तिची हत्या करून मृतदेह तिथेच सोडून निघून गेला, आणि नेहमीच्या जागेवर जाऊन झोपला होता. माहीम पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अपहरण, हत्या, अत्याचारासह पोस्कोच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मेहंदीला शनिवारी विशेष सत्र न्यायालयात हजर केले जाईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास चव्हाण यांनी सांगितले.

First Published on: February 8, 2019 9:17 PM
Exit mobile version