पत्नीचा मृतदेह गाडीत ठेवून पती आठ तास फिरला

पत्नीचा मृतदेह गाडीत ठेवून पती आठ तास फिरला

मयत पत्नीला गाडीतून फिरणाऱ्या नवऱ्याला कांदिवली पोलिसांनी नुकतेच अटक केले आहे. बोरीवली ते अधेंरीदरम्यानच्या विविध रुग्णालयांमध्ये मृतदेहाला दाखल करुन तीच्यावर उपचार करण्याची मागणी त्याने केली. पत्नी मयत झाली असल्याचे माहिती असून देखील पतीने तब्बल आठ तास तीचा मृतदेह गाडीतून फिरवला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीवर आत्महत्येस प्रेरणा देण्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. अटकेनंतर त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गळफास लावून केली आत्महत्या

सोकलाराम पुरोहित (२८) आणि त्याची पत्नी अंधेरीतील साकीनाका परिसरात राहत होते. पुरोहितचे याच परिसरात एक दूकान आहे. रात्री १.३० च्या सुमारास दूकान बंद करुन तो घरी परतला. त्यावेळी पत्नीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. कोणालाही न कळवता त्याने मृतदेह पंख्यावरुन खाली काढून गाडीच्या मागच्या सीटवर ठेवला. याच परिसरात असलेल्या एका रुग्णालयात त्याने तीचा मृतदेह उपचारासाठी नेला.

उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. यानंतरही त्याने मयत पत्नीचा मृतदेह गाडीतूनच दूसऱ्या रुग्णालयात नेला. तिथेही त्याला तीच माहिती देण्यात आली. त्यानंतर त्याने मृतदेह पून्हा घरी आणला. सकाळी ९ च्या सुमारास त्याने पुन्हा मृतदेह बोरीवली येथे आणला. त्यानंतर पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती तिच्या सावत्र भावाला फोनवरुन दिली. सावत्र भावाने मृतदेह सरकारी रुग्णालायात नेण्याचा सल्ला दिला. सकाळी ९ वाजून ३० मिनीटांनी त्याने हा मृतदेह कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात नेला. बराचवेळ झाल्याने मृतदेहाला वास सुटला होता आणि तिच्या गळ्यावर व्रण उठले होते. यावरुन रुग्णालायातील कर्मचाऱ्यांना संक्षय आला. त्यांनी याची माहिती कांदिवलीतील स्थानिक पोलिसांना कळवली. पोलिसांनी सोकलरामची चौकशी केली असता घडलेला प्रकार त्याने पोलिसांना सांगितला.

मुल होत नसल्याने केली आत्महत्या

“सोकलाराम पुरोहित आणि त्याच्या पत्नीचे लग्न होऊन बरेच वर्ष झाले तरीही त्यांना मुल होत नव्हते. या कारणावरुन दोघांची नेहेमी भांडणे होत होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.”, अशी माहिती झोन १० चे पोलीस उपायुक्त एन. रेड्डी यांनी दिली.

First Published on: June 21, 2018 5:48 PM
Exit mobile version