मनोहर जोशींच्या ‘प्रशासन’ पुस्तकाचं प्रकाशन!

मनोहर जोशींच्या ‘प्रशासन’ पुस्तकाचं प्रकाशन!

शिवसेेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींना विश्वास

माजी लोकसभा अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांच्या ‘प्रशासन’ या १४ व्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा त्यांच्या ८१ व्या जन्मदिनी रविवारी २ डिसेंबर रोजी मुंबईतल्या स्वा. सावरकर सभागृहात संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे. या पुस्तकाला उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. या पुस्तकामध्ये अनेक मान्यवरांच्या मुलाखती आहेत.

काय आहे या पुस्तकात?

या पुस्तकात प्रशासनाचं काम कसं असावं? या मुद्द्यावर प्रशासन क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या आहेत. या पुस्तकाची सुरुवातच निवृत्त न्यायाधीश भीमराव नाईक यांच्या मुलाखतीने होते. पुढे उद्योगमंत्री सुभाष नाईक, निवृत्त मुख्य सचिव दिनेश अफझलपुरकर, माजी राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण, आपल्या कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे, निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार, देशाला अभिमान असलेले लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, शिक्षण क्षेत्रातील विद्यालंकार विश्वास देशपांडे, स्वाभिमानी शेतकरी खासदार राजू शेट्टी, सहकारतज्ज्ञ विनय कोरे, जिद्दी उद्योजक गिरीश व्यास इत्यादी मान्यवरांच्या मुलाखतींचा समावेश आहे. प्रशासनात दिव्यांगांच्या समस्यांसाठी कार्यरत असलेले यशवंत पाटील, सूर्यकांत लाडे, सुभाष कदम, चंद्रकांत चव्हाण यांच्याही मुलाखती या पुस्तकात आहेत. प्रशासकीय गोंधळाचे उदाहरण म्हणून क्रिस्टल टॉवर दुर्घटनेसंदर्भात त्यांनी नगरसेविका ऊर्मिला पांचाळ यांची घेतलेली मुलाखत लक्षणीय आहे.

पुस्तकाबद्दल काय म्हणतात उद्धव ठाकरे?

मोजके पण नेमके प्रश्न, स्पष्ट संवाद आणि थेट मुद्द्यांना हात हे पुस्तकातील मुलाखतींचे वैशिष्ट्य आहे. या मुलाखती म्हणजे केवळ मान्यवरांचा एकतर्फी अनुभव नसून हा दोन अनुभवी मान्यवरांमधला मुलाखतवजा संवाद आहे. ‘प्रशासन सांभाळणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नाही, हे मनोहर जोशींचे पुस्तक वाचून लक्षात येते. ज्यांना आपापल्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे आहे त्यांनी जोशी सरांच्या प्रशासकीय अनुभवाचा फायदा या पुस्तकातून घेतलाच पाहिजे’, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत आपली भूमिका मांडली आहे.

First Published on: November 26, 2018 10:49 PM
Exit mobile version