घामांच्या धारांनी मुंबईकर हैराण!

घामांच्या धारांनी मुंबईकर हैराण!

उकाड्याने ग्रासलेला मुंबईकर

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अचानक प्रचंड उकडू लागले आहे. घामाच्या धारा अंगातून निघत आहेत. त्यामुळे मुंबईचे तापमान वाढले की काय, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. मात्र या परिस्थितीचा तापमान वाढीशी काही एक संबंध नाही. मुंबईच्या हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे मुंबईत प्रचंड उकडू लागले आहे. कुलाबा वेधशाळेने ८७ टक्के आर्द्रता नोंदवली आहे. तर सांताक्रूझ वेधशाळेने नोंदवलेली आर्द्रता ७६ टक्के इतकी आहे. मुंबईचे तापमान दुपारच्या वेळी मात्र ३४-३५ अंश सेल्सियस इतकेच आहे.

आर्द्रतेचे प्रमाण वाढले

आर्द्रतेमुळे निर्माण झालेला उकाडा मुंबईकरांना सहन होईनासा झाला आहे. रविवारी तर सुट्टीचा दिवस असूनही सकाळच्या वेळी मुंबईकरांनी घरात एसीमध्ये अथवा पंख्याखाली राहणेच पसंद केले. सोमवारीही मुंबईत तिच स्थिती होती. कामासाठी निघालेला मुंबईकर उकाड्याने हैराण झाला होता. कामावर पोहचेपर्यंत घामाने भिजून गेला होता. आगामी दोन दिवस मुंबई आणि उपनगरात हिच स्थिती राहिल असे वेधशाळेकडून कळवण्यात आले.

 

मान्सून केरळमध्ये दाखल

उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना एक आनंदाची बातमीही आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. योग्य परिस्थिती राहिली तर आगामी तो काही दिवसांतच मुंबईत धडकणार आहे. सध्या अंदमान, निकोबारमध्ये मान्सून स्थिर झाला आहे. वेधशाळेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आगामी दोन दिवसांत दक्षिण कोकणात विजेच्या कडकडांसह मान्सूनपूर्व पाऊस पडेल. तसेच उत्तर कोकणातही अशा पावसाची दोन दिवसांनंतर अपेक्षा आहे. दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या पावसाची शक्यता आहे.

मुंबईकरांना दिला क्षणिक दिलासा

मुंबई ही उत्तर कोकणात येते. त्यामुळे मुंबईतही पावसाची शक्यता आहे. मुंबईतील परळ, दादर टी. टी. या भागात रविवारी पहाटे पावसाचे काही थेंब पडले. सामान्यत: ७ जून ही मुंबईत मान्सून दाखल होण्याची तारीख आहे. पण यावर्षी पाऊस दोन दिवस अगोदरच मुंबईत दाखल होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

First Published on: May 29, 2018 8:37 AM
Exit mobile version