मनसुख हिरेन यांचा मृत्यू बुडूनच, ठाणे पोलिसांनी जाहीर केला प्राथमिक अहवाल

मनसुख हिरेन यांचा मृत्यू बुडूनच, ठाणे पोलिसांनी जाहीर केला प्राथमिक अहवाल

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातील मुंब्रा रेतीबंदर याठिकाणी सापडला होता. या मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल ठाणे पोलिसांमार्फत जाहीर करण्यात आला आहे. मनसुख हिरेन यांचा मृत्यू बुडूनच झाल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. ठाणे पोलिसांकडून हा अहवाल आता मुंबई पोलिसांना माहितीसाठी पाठवण्यात आला आहे. या शवविच्छेदन अहवाल प्रकरणात ठाणे पोलिसांकडून आणखी एक सल्ला घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. हिरेन कुटुंबीयांनी शवविच्छेदन अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली होती. तसेच हिरेन कुटुंबीयांनी या शवविच्छेदन प्रक्रियेतील व्हिडिओ फुटेजची मागणी केली होती. अॅटॉप्सी अहवाल, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे याची माहिती द्यावी अशी मागणी कुटूंबीयांनी केली होती.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, अंबानीच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओचा तपास हा दहशतवाद विरोधी पथक (ATS)कडे देण्यात येणार असे स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते. त्यानुसारच एटीएसची टीम आज शनिवार ठाण्याच्या मुंब्रा येथील रेतीबंदर येथे पोहचली. रेतीबंदर याठिकाणी स्कॉर्पिओ मालक असलेल्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला होता. त्याठिकाणीच एटीएसच्या टीमने पाहणी केली. या प्रकरणाचा तपास नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सीमार्फत करावा अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती.

काय म्हणणं आहे कुटूंबीयांचे ?

गुरूवारी पोलिसांना भेटायला जातो असे सांगून मनसुद हिरेन घरी परत आलेच नाहीत. त्यांना कांदीवलीच्या तावडे यांचा फोन आला होता. तावडे हे क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याचा संशय आहे. मनसुख यांना तावडे यांचा शेवटचा फोन आला होता. आम्ही रात्रभर त्यांची वाट पाहत होतो मात्र ते घरी परत आले नाहीत, असे मनसुख हिरेन यांची पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांना सांगितले. माझ्या कुटुंबियांसोबत असे काही होऊ शकते असा विचारही मी कधी करु शकत नाही. माझे पती आत्महत्या करुच शकत नाहीत,अशा भावना विमल हिरेन यांनी व्यक्त केल्या. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, माझ्या पतीच्या मृत्यूमागचे सत्य समोर यायला हवे अशी मागणी विमल हिरेन यांनी केली आहे.

 

 

First Published on: March 6, 2021 2:45 PM
Exit mobile version