मनसुख हत्या प्रकरण: आरोपींना आज न्यायालयात केले जाणार हजर

मनसुख हत्या प्रकरण: आरोपींना आज न्यायालयात केले जाणार हजर

मनसुख यांना देण्यात आलेला क्लोरोफार्म आहे तरी काय ?

स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एटीएसने दोन जणांना अटक केली आहे. या दोघांना आज दुपारी ठाण्याच्या सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात एटीएसची पहिली अटक असून आणखी काही पोलीस अधिकारी एटीएसच्या रडारवर असल्याचे एटीएसच्या सूत्राकडून समजते. अटक केलेल्या या दोघांपैकी एक जण बडतर्फ पोलीस शिपाई असून दुसरा क्रिकेटबुकी आहे.

अटक करण्यात आलेला पोलिस शिपाई विनायक शिंदे (५५) याला लखनभैया खोट्या चकमकीत अटक झाली होती व सध्या तो संचित रजेवर तुरुंगातून बाहेर आला होता. तर नरेश डोरा (३५) हा ठाण्यातील क्रिकेट बुकी असून त्याने विनायक शिंदेला मोबाईल सिम घेऊन दिल्याचा आरोप आहे. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ मिळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह ५ मार्च रोजी मुंब्रा खाडीत मिळून आला होता.

या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला होता, याप्रकरणी एटीएसने हत्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्हयात एटीएसकडून मुंबई तसेच ठाण्यातील दोन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकारी यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यानंतर एटीएसच्या हाती काही या गुन्ह्या संदर्भात काही पुरावे मिळून आले होते. या पुराव्याच्या आधारे शनिवारी रात्री एटीएने बडतर्फ पोलीस शिपाई विनायक शिंदे आणि क्रिकेटबुकी नरेश डोरा या दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. या दोघांचा मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सहभाग आढळून आला असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली आहे. या दोघांच्या अटकेनंतर एटीएसच्या तपासाला गती आली असून याप्रकरनात आणखी काही जणांची अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


 

First Published on: March 21, 2021 2:15 PM
Exit mobile version