नाल्यात फेकलेल्या टायगरला दत्तक घेण्यासाठी पालकांची रस्सीखेच

नाल्यात फेकलेल्या टायगरला दत्तक घेण्यासाठी पालकांची रस्सीखेच

टायगर जिवंत आहे हे समजताच त्याला दत्तक घेण्यासाठी दाम्पत्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे.

उल्हासनगर येथे २३ दिवसांपुर्वी एक लहान बालक काळ्या पिशवित नाल्यात फेकले होते. १८ दिवसानंतर ते बाळ रडायला लागले. ही बातमी २० जानेवारी रोजी आपलं महानगरमध्ये प्रसिद्ध झाली. बाळाची प्रकृती सुधारत असल्याचे समजताच, समाजसेवक शिवाजी रगडे-तोरणे यांनी त्याबाळाचे नाव ‘टायगर’ ठेवले होते. ‘टायगर जिंदा है’, अशी बातमी समजताच त्याला दत्तक घेण्यासाठी दाम्पत्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे.

हे वाचा – चमत्कार: जन्मानंतर १८ दिवसांनी बाळ प्यायले दूध, नाव ठेवले टायगर

टायगरला दत्तक घेण्याची प्रक्रिया अशी असेल

दत्तक घेण्याच्या प्रक्रियेबाबत महिला व बालकल्याण समितीच्या प्रमुख सुनिता बाभुळकर-ईंगळे यांना विचारले असता. त्यांनी सांगितले की, हे बाळ सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. बाळाच्या प्रकृती बाबतचा अंतिम अहवाल डॉक्टरांनी दिल्यानंतर ते बाळ आमच्याकडे सुपुर्द करतील. बाळाच्या संगोपणासाठी आणि दत्तक प्रक्रियेसाठी आमच्या अखत्यारीत असलेल्या डोंबिवली येथील जननी आशिष आणि नेरूळ येथील विश्व बालक या संस्थाकडे टायगरला सोपविण्यात येईल. दरम्यान या बालकावर ज्या पोलिसांचा ताबा आहे, ते चार महिने त्याच्या खऱ्या आई-बाबाचा शोध घेतील. त्यानंतर टायगरची सविस्तर माहिती इंटरनेट आणि वृत्तपत्रात प्रसिद्ध करतील. त्यानंतरही खरे पालक समोर न आल्यास महिला बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार दत्तक प्रक्रिया हाताळली जाईल.

टायगर कुणाला मिळणार

टायगर आपल्यालाच मिळावा यासाठी शासकीय रुग्णालयात १२ अर्ज आले आहेत. तसेच रोज अनेक फोन येत आहेत. मात्र ही दत्तक घेण्याची प्रक्रिया कठीण आहे. बाळ ज्यांना हवे आहे त्या दाम्पत्यांचा फोटो संस्थेत लावला जातो. तर दुसरी कडे संस्थेतील अनेक बालकांचे फोटो दाखवले जातात. कोणत्या दाम्पत्याला बाळ द्यायचे आहे, याची शहानिशा झाल्यानंतर अटी-शर्तीनुसार बाळ योग्य आणि पात्र दाम्प्त्यांच्या ताब्यात दिले जाते, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.

First Published on: January 23, 2019 11:14 AM
Exit mobile version