Lockdown Crisis: वांद्र्यात जमलेली मजुरांची गर्दी आणि गोंधळात टाकणारे प्रश्न

Lockdown Crisis: वांद्र्यात जमलेली मजुरांची गर्दी आणि गोंधळात टाकणारे प्रश्न

वांद्रे पश्चिम येथे १४ एप्रिल रोजी जमलेली गर्दी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. १४ एप्रिल) सकाळी १० वाजता लॉकडाऊनचा दुसरा टप्पा जाहीर केला. आधीच २१ दिवसांच्या लॉकडाऊन कसाबसा काढला असताना मोदींनी आणखी १९ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. लगेचच दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान हजारो मजुरांची गर्दी मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या वांद्रे स्थानकाबाहेर जमा झाली. एका बाजुला मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट झाली असताना अचानक हजारो लोक एकत्र जमल्यामुळे प्रशासनाची मात्र हवाच उडाली. पोलिसांनी या गर्दीवर कसेबसे नियंत्रण मिळवले. मात्र त्यानंतर सुरु झालेल्या राजकीय हेवेदाव्यामुळे काही गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. हे प्रश्न गोंधळात टाकणारे तर आहेतच, पण मुंबईच्या चिंतेत भर टाकणारे आहेत.

लॉकडाऊन सुरु होण्याच्या आधीपासूनच महाराष्ट्रात १४४ कलम लागू केलेले होते. त्यामुळे मागच्या २५ दिवसांत या जमावबंदी कलमाचे उल्लंघन झाल्याचे प्रकरण समोर आलेले नाही. लोक अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी, भाजी मंडईत, सुपर मार्केटमध्ये गर्दी करत आहेत. मात्र ती गर्दी विरोध म्हणून नाही तर नाईलाज म्हणून एकत्र येत होती. मात्र वांद्रे स्थानकात मंगळवारी जमा झालेली गर्दी ही सरकारला आव्हान देणारी होती.

हे वाचा – Lockdown Crisis: वांद्रे गर्दीनंतर सूरतमध्ये पुन्हा एकदा मजूरांचे आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी रात्री ८ वाजता देशाला संबोधित करताना मध्यरात्रीपासून लॉकडाऊन होईल, अशी घोषणा केली. या निर्णयाचे सर्वांनीच स्वागतच केले. “कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा आहेच, मात्र लॉकडाऊन म्हणजे काही नोटबंदी नाही. लोकांना थोडा वेळ द्यायला हवा होता”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली होती. त्यानंतर १४ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा लाईव्ह येत लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला. यावेळी मात्र आपल्या घरी जाण्याची आस लावून बसलेल्या भारतातल्या प्रत्येक राज्यातील मजूरांची चलबिचल सुरु झाली. त्यानंतर दुपारी वांद्रे स्थानकात हजारो मजूर जमा झाले आणि एकच गोंधळ उडाला.

यानिमित्ताने निर्माण झालेले काही गंभीर प्रश्न

– मुंबईत रोजगारासाठी प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहारमधून सर्वाधिक कामगार येतात. या दोन्ही राज्यात जाणाऱ्या ट्रेन या वांद्रे पुर्व येथे असलेल्या वांद्रे टर्मिनस आणि कुर्ल्यातील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटतात. मग हे मजूर वांद्रे पश्चिम येथेच का जमा झाले?

– तसेच उत्तर भारतात जाणाऱ्या बहुतेक रेल्वे या रात्री उशीरा किंवा पहाटे सुटतात. मग दुपारीच हे लोक कसे काय जमा झाले?

– वांद्रे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या जामा मशिदीजवळ या हजारो मजुरांनी धरणे आंदोलन केल्यामुळे संभ्रमात भर पडतेय?

– सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर या मजूरांना आपल्या गावी जायचे होते, तर मग एकाच्याही हातात सामानाची बॅग, एखादी पिशवी किंवा इतर साहित्य का नव्हते?

– कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वच लोक काळजी घेत आहे. मात्र इथे जमलेल्या एकाही व्यक्तीने तोडांला मास्क लावला नव्हता, सोशल डिस्टसिंगची तर बोंब होती. इतकी बेफिकीरी यांच्यात का आली होती?

– वांद्रे येथे गर्दी जमल्याप्रकरणी विनय दुबे नामक व्यक्तीला अटक झाली आहे. मात्र त्याने १८ एप्रिल रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसला कामागारांनी जमावे असे आवाहन केले होते. मग १४ एप्रिललाच वांद्रे पश्चिम येथील मशिदीसमोर मजूर का जमा झाले?


 

First Published on: April 15, 2020 10:01 AM
Exit mobile version