मुंबई बंद स्थगित; सकल मराठा समन्वयकांची घोषणा

मुंबई बंद स्थगित; सकल मराठा समन्वयकांची घोषणा

मुंबईतील बंद स्थगित

मुंबईमध्ये सकल मराठा समाजाने पुकारलेला बंद स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दादर येथील शिवाजी मंदिरामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये समन्वयकांनी मुंबईतील बंद स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली. यावेळी आंदोलकांनी शांतता राखण्याचे आवाहन देखील करण्यात आले. दरम्यान नोकरदार वर्गाला घरी परतायला कोणताही अडथळा निर्माण करून नका, असे आवाहन पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले. मराठा आरक्षणावरून आक्रमक होत सकल मराठा समाजाने मुंबई बंदची हाक दिली होती. सकाळपासून अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. काही ठिकाणी दुकाने देखील बंद करण्यात आली. ठाण्यातील तीनहात नाका येथे बसची तोडफोड करण्यात आली. शिवाय टायर देखील जाळण्यात आले. कळंबोळी आणि ठाण्यातील नितीन कंपनी येथे बंदला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी आक्रमक होत पोलिसांवर दगडफेक केली. त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकर्त्यांवर लाठीचार्ज केला. तसेच अश्रुधूराच्या कांड्या फोडण्यात आल्या तसेच हवेत गोळीबार देखील केला. काही ठिकाणच्या घटना वगळता मुंबईतील बंद हा सुरळीत पार पडला. मुंबईच्या दैनंदिन व्यवहारावर बंदचा जास्त काही परिणाम झालेला नाही.

बंद स्थगितीची घोषणा

मुंबई बंदचे आवाहन केल्यानंतर दुपारी २ वाजता सकल मराठा समजाने शिवाजी मंदिर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी मुंबईतील बंद स्थगित करत असल्याची घोषणा मुंबईतील समन्वयक विरेंद्र पवार यांनी केली. कळंबोली येथे बंदला हिंसक वळण लागले. यावेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांनी देखील जमावावर लाठीचार्ज केला. दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये शांततेचे आवाहन करण्यात आले. तर बंदमध्ये काही हिंसक प्रवृत्तीचा सहभाग असण्याची शक्यता देखील समन्वयकांनी व्यक्त केली. यावेळी नागरिकांना काही त्रास झाला असल्यास आम्ही त्यांची माफी मागतो, असे देखील समन्वयकांनी स्पष्ट केले. आंदोलकांनी शांतता राखावी. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील बंद स्थगित करत असल्याची घोषणा यावेळी पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली.

मुंबई बंदचे आवाहन

शांततेमध्ये ५८ मराठे मोर्चे काढण्यात आले. मात्र सरकारने आश्वासनांच्या पलिकडे काहीच दिले नाही. त्यामुळे आक्रमक होत सकल मराठा समाजाने मुंबई बंदची हाक दिली. आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक झालेल्या मराठा समाज आज मुंबईतील रस्त्यावर उतरला. बंद दरम्यान काही ठिकाणी शांततेला गालबोट लागले. मात्र जनजीवनावर कोणताही परिणाम झाला नाही. बंद दरम्यान जीवनावश्यक गोष्टींच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. शिवाय बंद दरम्यान पालन कराव्या लागणारी आचारसंहिता देखील जाहिर करण्यात आली होती.

First Published on: July 25, 2018 3:35 PM
Exit mobile version