भुजबळ, वडेट्टीवारांविरोधात मराठा नेत्यांची राज्यपालांकडे तक्रार

भुजबळ, वडेट्टीवारांविरोधात मराठा नेत्यांची राज्यपालांकडे तक्रार

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, पण त्यासाठी ओबीसींच्या आरक्षणावर कोणत्याही परिस्थितीत गदा आणू दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेणार्‍या छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार या आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर मराठा समाजाचा प्रचंड रोष आहे. ओबीसी आणि मराठा समाजात हे मंत्री तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करत मराठा समन्वयकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रयत्नही सुरू आहेत. मात्र, अशा परिस्थितीत राज्य मंत्रिमंडळातील मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री विजय वडेट्टीवार हे मात्र मराठा समाज-ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप मराठा नेते करत आहेत. विशेष म्हणजे मराठा आरक्षण ओबीसी गटात देण्याची मागणी मराठा समाजातील एक गट करत आहे. याला भुजबळ आणि वडेट्टीवार हे कडाडून विरोध करत आहेत. यामुळे नाराज मराठा नेते या मंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी करत आहेत.

ही मागणी घेऊन मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि छावा संघटनेचे नेते त्यांच्या राजीनाम्यासाठी राज्यपालांकडे मागणी करू लागले आहेत. मराठा लढ्यांमध्ये समाजातील १४ हजार ७०० बांधवांवर गुन्हे दाखल झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची लढाई सुरू असून महाविकास आघाडी सरकारचे वकील बाजू मांडण्यास कमी पडत आहेत, असा आक्षेप या संघटनांचे नेते घेत आहेत. यासाठी आपण पुढाकार घेऊन मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा, अशी विनंती या नेत्यांनी राज्यपालांना केली आहे.

राज्य मंत्रिमंडळातील ओबीसी समाजाचे मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री विजय वडेट्टीवार हे मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण करून जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे या नेत्यांनी राज्यपालांना सांगितले. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असे भडकावू वक्तव्य ते नेहमी मेळावा, सभा, पत्रकार परिषदांमध्ये करत मराठा आणि ओबीसी या दोन समाजात संघर्ष निर्माण करत असल्याची तक्रार हे नेते करत आहेत.

First Published on: December 30, 2020 6:47 AM
Exit mobile version