‘उपाध्यक्ष हे अपत्य जन्माला घालायला भाजपला ४ वर्षे लागली’

‘उपाध्यक्ष हे अपत्य जन्माला घालायला भाजपला ४ वर्षे लागली’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार

अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाना साधला आहे. उपाध्यक्ष हे अपत्य जन्माला घालायला भाजपला ४ वर्ष लागली असल्याची टीका त्यांनी केली आहे. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु तिथपासून आजपर्यंत विधानसभेचे उपाध्यक्ष पद रिक्त ठेवण्यात आले होते. भाजप सरकार आलं आणि पहिलं, दुसरं , तिसरं वर्ष गेलं आणि चौथंही संपलं म्हणजे भाजप-सेना सरकारला या अपत्याला जन्माला घालायला चार वर्ष लागली अशी मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. विधानसभेच्या उपाध्यक्ष पदाची आज निवड करण्यात आली. त्यावेळी उपाध्यक्ष विजय औटी यांचे अभिनंदन करताना अजित पवार यांनी भाजप सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली.

औटींना पहिल्यांदाच हे पद दयायला हवे होते

विजय औटी हे उपाध्यक्ष झाले आम्हाला आनंदच आहे. त्यांना पहिल्यांदाच हे पद दयायला हवे होते. त्यामुळे अधिक आनंद झाला असता. विजयराव औटी हे मी तेवढा राजकारणात नव्हतो त्यावेळी समाजवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष होते. अतिशय तळमळीचे कार्यकर्ते म्हणून त्यांना मी ओळखतो.ते अरुण मेहता, सुरेश कलमाडी यांच्यासोबत ते काम करत होते असेही अजित पवार म्हणाले. विजयराव औटी यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध आहे. हे कुटुंबच समाजाशी जुळलेलं आहे. औटी हे जुने समाजवादी विचारांचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत. त्यामुळे त्यांना ही संधी मिळाली याचा आनंद आहे असे म्हणत अजित पवार यांनी म्हटले आहे.

४२ जणांच्या कुटुंबियांना १५ लाख द्या

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या लोकांना जसे १५ लाखाची मदत दिली जाणार आहे तशीच मदत सरकारने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना व मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या ४२ जणांच्या कुटुंबियांना १५ लाखाची मदत दयावी अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. मराठा विधेयक सभागृहात मंजुर करण्यात आले. त्याचे स्वागतही केले परंतु राज्याचे प्रमुख सभागृहात आहेत. याच सभागृहामध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शब्द दिला होता. अवनीच्या हल्ल्यात मृत झाले त्यांना १० ते १५ लाखाचे अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जनावरांचा मृत्यू झाल्यास त्यांची भरपाई ६० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

First Published on: November 30, 2018 5:23 PM
Exit mobile version