सूंपर्ण प्रश्नपत्रिका सोडवूनही गुण मिळाले ‘शून्य’

सूंपर्ण प्रश्नपत्रिका सोडवूनही गुण मिळाले ‘शून्य’

विद्यापीठ अनुदान आयोगाचे संकेत

एकीकडे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर विविध कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. त्यांना विश्वासात घेत आहेत, दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठ प्रशासन त्यांच्या भोंगळ कारभारामुळे कुलगुरूंच्या प्रयत्नांवर बोळा फिरवण्याचे काम करत आहे. याला पुष्टी देणारा प्रकार लॉ शाखेत उघडकीस आला आहे. वांद्य्रातील जी.जे. अडवाणी लॉ कॉलेजमधील तृतीय वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थिनीला पाचव्या सत्राच्या परीक्षेत सूंपर्ण प्रश्नपत्रिका सोडवूनही शून्य गुण मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात तिने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे विचारणा केली असता तिला तुझ्याप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज आल्यावर एकत्रितपणे निर्णय घेण्यात येईल, असे उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले.

अडवाणी विधी कॉलेजमधील काजल पाटील ही विद्यार्थीनी तृतीय वर्षात शिकत आहे. जानेवारीमध्ये लॉ शाखेच्या झालेल्या पाचव्या सत्राच्या परीक्षेत काजलने पब्लिक इंटरनॅशनल लॉ विषयाची प्रश्नपत्रिका संपूर्ण सोडवली, परंतु परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर त्यात तिला शून्य गुण देण्यात आल्याचे दिसले. यासंदर्भात तिने मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाशी संपर्क साधून त्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली असता त्यांनी तिला परीक्षेला उपस्थित असल्याचे हजेरीपत्रक सादर करण्यास सांगितले. त्यामुळे काजलने कॉलेजमधून परीक्षेचा हजेरीपट विद्यापीठाला सादर केला. त्यावर विद्यापीठाकडून तिला एक आठवड्याने येण्यास सांगितले. आठवडाभरानंतर तिने विद्यापीठाशी संपर्क साधला असता परीक्षा विभागाकडून काजोलला असा प्रकार अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज आल्यावर एकत्रित याबाबत तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले.

गैरहजर दाखवून एटीकेटीचा अर्ज भरण्याचे अजब फर्मान
हा सर्व प्रकार जाणून घेतल्यानंतर विद्यापीठाने काजलला संबंधित पेपरला गैरहजर दाखवून एटीकेटीचा अर्ज भरण्यास सांगण्यात आले, परंतु आपण उतीर्ण झालो की अनुतीर्ण हेच अजून स्पष्ट झाले नसल्याने एटीकेटीचा अर्ज का भरायचा, असा प्रश्न काजलकडून उपस्थित करण्यात आला आहे. काजलने पूर्ण पेपर लिहूनही तिला शून्य मार्क दिल्याने व नंतर तिला गैरहजर असल्याचे दाखवण्यात आल्याने आता तिला तिचा पेपर पुनर्मूल्यांकनालाही देता येणार नाही. परिणामी तिच्या समस्येत आणखी वाढ झाली आहे. यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी करणारे पत्र स्टुडंट लॉ काऊन्सिलकडून कुलगुरूंना पाठवण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पवार यांनी दिली.

First Published on: April 13, 2019 4:05 AM
Exit mobile version